जिल्ह्यातील सुमारे 50 हजार व्यक्ती होणार सहभागी; सरकारी निमसरकारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीची माहिती; जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांचा समावेश; कोरोनाचे नियम पाळून होणार आंदोलन
प्रतिनिधी / कोल्हापूर
नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करा, यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 23 व 24 फेब्रुवारीला सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर जात आहेत. यामध्ये जिल्हयातील सुमारे 50 हजारजण सहभागी होणार आहेत, अशी माहिती सरकारी निमसरकारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
अनिल लवेकर म्हणाले, मार्च 2020 पासून कोवीड 19 चा प्रादुर्भाव यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. राज्याची अर्थगतीही मंदावली. पण याच कालावधित राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षकांनी परिस्थितीला न डगमगता आपली कर्तव्ये वेळच्या वेळी पार पाडली. गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री तसेच मुख्य सचिव पातळीवर चर्चा व्हावी, यासाठी समन्वय समितीने सातत्याने प्रयत्न केले आहेत. परंतु समन्वय समितीस शासनाकडून विविध कारणांमुळे अद्यापही चर्चेला बोलविलेले नाही. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये संतापाचा सूर आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य समितीने 23 व 24 फेब्रुवारी राज्यस्तरीय दोन दिवसांच्या संपाचा निर्णय घेतला आहे. या संपात जिह्यातील सुमारे 50 हजार सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होणार आहेत. संपाच्या दोन्ही दिवशी सर्वजण सकाळी 10 ते दुपारी 12 यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाशेजी महावीर उद्यान येथे कोरोनाचे सर्व नियम पाळत एकत्र जमणार आहेत. या ठिकाणी वक्त्यांची भाषणे झाल्यावर सर्वजण घरी जातील. तसेच अत्यावश्यक सेवेत असणारे आरोग्य कर्मचारीही आपले कर्तव्य बजावत यामध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी वसंत डावरे, भरत रसाळे, राजेश वरक, अनिल घाटगे, अनिल खोत, संजीवनी दळवी, हाश्मत हावेरी, नंदकुमार इंगवले, संजय कडगावे, विठ्ठल वेलणकर, सतीश ढेकळे, सुधाकर भांदीगरे, अनिल कांबळे आदी उपस्थित होते.