ऑनलाईन टीम / मुंबई :
राकेश वाधवान हा पीएमसी बँक घोटाळय़ातील मुख्य आरोपी आहे. त्याचे किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील याच्याशी आर्थिक संबंध आहेत. दोघेही व्यवसायात पार्टनर आहेत. त्यामुळे त्यांना पीएमसी घोटाळ्यातील आरोपांखाली अटक करावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. ते म्हणाले, निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी सोमय्या आणि त्यांच्या मुलांची आहे. राकेश वाधवान त्यांचा पार्टनर आहे. त्यांचा वसईत प्रकल्प आहे. पीएमसी घोटाळय़ातला मुख्य आरोपी असलेल्या वाधवानकडून कोटय़वधी रुपयांची जमिन लडानी याच्या नावावर घेतली. रोख रक्कमसुद्धा घेतली ही रक्कम 80 ते 100 कोटींच्या घरात आहे. जमिन लडानीच्या नावावर घेतली. वसईत 400 कोटी रुपयांची जमिन साडेचार कोटी रुपयांना घेतली. वाधवानशी आर्थिक संबंध असल्याने सोमय्या आणि त्यांच्या मुलाला पीएमसी घोटाळ्यातील आरोपांखाली अटक करावी.








