संसदेत शिरण्याचा लोकांचा प्रयत्न : कॅनबरामध्ये रस्त्यांवरील वाहतूक रोखली
वृत्तसंस्था / कॅनबरा
ऑस्ट्रेलियाच्या राजधानीत हजारो लोकांनी कोरोना लसीकरण अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. कॅनबरामध्ये 10 हजारांहून अधिक लोकांनी संघीय, राज्य आणि क्षेत्रीय सरकारांकडून कोरोना लसीकरण अनिवार्य करणारे सर्व आदेश त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. तसेच कॅनबराच्या रस्त्यांवरील वाहतूक या निदर्शकांनी रोखून धरली आहे.
याप्रकरणी शनिवारी 3 जणांना अटक करण्यात आली होती. तर सुमारे 100 हून अधिक निदर्शकांनी संसद भवनात बॅरिकेड्स तोडून घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी कॅनबराच्या एक्झिबिशन पार्कमध्ये ठाण मांडून बसलेल्या निदर्शकांना त्वरित तेथून बाहेर पडण्याचा अन्यथा अटक करण्याचा इशारा दिला आहे.
विद्यमान सरकारचे अनेक अधिकारीही या निदर्शनांमध्ये सामील झाल्याचे दिसून आले. हे पाहता विरोधी लेबर पार्टीने पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी निदर्शकांच्या विरोधात कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे. पंतप्रधानांनी निदर्शने करत असलेल्या हिंसक कट्टरवाद्यांची निंदा करावी. ऑस्ट्रेलियातील लोकशाहीत अशा हिंसक निदर्शनांना कुठलेच स्थान नसल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट करावे, असे लेबर पार्टीच्या प्रवक्त्या क्रिस्टीना केनेली यांनी रविवारी म्हटले आहे.