पोटच्या दोन्ही मुलांनी वृद्ध आई वडिलांना दाखवले बाहेरचा रस्ता
अक्कलकोट प्रतिनिधी
वृद्ध आई व वडिलांचा सांभाळ करण्यास नकार दिल्याप्रकरणी आळगी ता अक्कलकोट येथील दोन सख्ख्या भावांविरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फरीसाब गुडूसाब कुमठे व रमजान गुडूसाब कुमठे ही गुन्हा दाखल झालेल्या सख्ख्या भावांची नावे असुन, आई सुगराबी गुडूसाब कुमठे वय ७० यांनी या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिसात तक्रार दिली आहे. दरम्यान,आई-वडिलांचा सांभाळ न केल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल होण्याच्या घटनेमुळे दोन्ही मुलांविषयी तालुक्यातून द्वेषास्पद चर्चेला उधाण आले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी वृद्धेस सात मुली व दोन मुले असून सर्व मुलींचा विवाह झाला असून ते दिल्या घरी सुखी आहेत.फिर्यादिस ६ एकर जमीन असून सगळी शेती दोन्ही मुलांच्या नावे केली आहे.मोठा मुलगा फरीसाब हा पूर्वीपासून आई वडिलांना सांभाळत नसल्याने ते धाकट्या रमजानकडे राहत होते. पण गेल्या ६ महिन्यापासून धाकट्या मुलाने आपल्या आई वडिलांना घराबाहेर काढल्याने ते मुलगी अन्वरबी रा उटगी ता जत जिल्हा सांगली येथे राहत होते.दि ११ फेब्रुवारी रोजी तिन्ही मुली मिळून आपल्या आई वडिलांना मुलांजवळ सोडण्यासाठी आले असता दोन्ही मुले घराबाहेर थांबले होते.आम्ही किती दिवस मुलीकडे राहू ? आम्हाला तुम्ही का सांभाळत नाही असे म्हणले असता दोन्ही मुलांनी तुम्हा दोघांना सांभाळायचे होत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा ! तुम्ही आमच्या घरात राहिला तर तुम्हाला खलास करू अशी धमकी देऊन दमदाटी केली. घरात येऊ न दिल्यामुळे वृद्ध आई-वडील घराच्या बाहेर बसून राहिले. मधुमेह व ब्लडप्रेशरचा आजार असल्याने अशा वृद्धापकाळात कोणतेही काम करणे जमत नाही अशा सर्व आशयाची तक्रार वृद्ध आई सुगराबी कुमठे यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दिली आहे पुढील तपास पो.हे.कॉ. गोटे हे करीत आहेत.