जि.प.कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष राजीव परीट यांचा माहिती
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या गडहिंग्लज शाखेमध्ये व्यापारी सभासद मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यांच्या मागणीनुसार त्यांना रक्कम देणे आवश्यक आहे. त्यामुळे बँकेच्या सुट्टीदिवशी त्यांची आर्थीक गैरसोय होऊ नये म्हणून रोख रक्कम शिल्लक ठेवली होती. तेथील व्यवस्थापक अरूण जाधव हे हजर झाले असून त्यांनी रोख शिल्लक रक्कमेसह अन्य रेकॉर्ड सुपुर्द केले आहे. त्यामुळे संस्थेच्या संचालक मंडळासह सर्व सभासद आणि हितचिंतक ठेवीदारांचा संभ्रम दूर झाला असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष राजीव परीट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे. जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या गडहिंग्लज शाखेचे व्यवस्थापक अरूण जाधव हे 14 जानेवारीपासून रजा अर्ज पाठवून परस्पर रजेवर गेले होते. त्यांनी त्यांचा पदभार अन्य संस्थेच्या कर्मचाऱयांकडे दिला नसल्यामुळे संस्थेमध्ये संभ्रम झाला होता. याबाबत त्यांना नोटीस काढून तत्काळ पदभार व लॉकर किल्ली देण्याबाबत कळविले होते. पण ते हजर झाले नसल्यामुळे कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत संचालक मंडळाने निर्णय घेतला होता व त्याबाबत कार्यवाही चालु होती. पण शुक्रवारी (11 रोजी) जाधव हे गडहिंग्लज शाखेत समक्ष हजर होऊन हजर रिपोर्ट देवून त्यांती आपला पदभार व लॉकरसह सर्व चाव्या सादर केल्या आहेत. जाधव हे त्यांच्या घरगुती वैयक्तिक कलहातून मनस्थिती बरोबर नसल्यामुळे परस्पर रजेवर गेले असल्याबाबत हजर रिपोर्टमध्ये नमूद केले असून त्यांनी जि.प. सोसायटीमध्ये गेली 21 वर्षे सेवा केली आहे. त्यांनी आपल्या संपुर्ण सेवेमध्ये कार्यतत्पर राहून संस्थेची प्रामाणीक सेवा करून संस्थेचा नावलौकीक वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात देखील प्रामाणीकपणे काम करणार असल्याचे हजर रिपोर्ट मध्ये नमूद केले आहे.
संस्थेमध्ये 14 जानेवारी रोजी गडहिंग्लज शाखेची 35 लाख 76 हजारांची रक्कम शिल्लक होती. तर पदभार दिल्यानंतर देखील तितकीच रक्कम लॉकरमध्ये शिल्लक असल्याचे निदर्शनास आले आहे. संस्थेचा कारभार अत्यंत चांगल्या प्रकारे चालू असून सभासदांच्या हिताच्या दृष्टीने कर्जाचा व्याजदर 10 टक्के पर्यंत खाली आणला आहे. संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी विविध उपक्रम राबवून कारभार पारदर्शक करून संस्थेचा नावलौकीक वाढलेला आहे. सर्व सभासद, हितचिंतक, ठेवीदार व संस्थेचे सर्व कर्मचारी यांचे बहूमोल योगदान मिळाले आहे. भविष्यातही संस्थेमार्फत सभासदांना आणखी उपयुक्त सुविधा पुरविणे बाबत संचालक मंडळ सक्रीय प्रयत्न करत आहेत.