कोल्हापूर प्रतिनिधी
ओबीसींचा जनगणना डाटा चुकीचा असून, ओबीसींची जनगणना जातीनिहाय करावी या मागणीसाठी सोमवारी सकाळी 11 वाजता ओबीसी जनमोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे अशी माहीती ओबीसी जनमोर्चाचे माजी महापौर नंदकुमार वळंजू, दिगंबर लोहार, सयाजी झुंजार, बबन रानगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिगंबर लोहार यांनी सांगितले, ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना चुकीची आहे. 1931 मध्ये इंग्रज काळात 475 ओबीसी जातींचे आरक्षण 52 टक्के इतके होते. पण मागासवर्गीय आयोगाने मात्र निवडणूक आयोगाकडे ओबीसींचे आरक्षण 32 टक्के दाखवले आहे. हा जनगणना डाटा पुर्णपणे चुकीचा असल्याने, याची दुरूस्ती केल्याशिवाय कोणतीच निवडणूक घेऊ नये. यासाठी ओबीसी जनमोर्चाच्यावतीने टप्प्याटप्याने आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
सरकारने ओबीसींच्या आरक्षणाचा खेळखंडोबा सुरू केला आहे. निवडणूक आयोगाने ओबीसींचा डाटा चुकीचा दाखवला असल्याने, ओबीसींना कोणतेच फायदे मिळू शकणार नाही. ओबीसींची जनगणना चुकीची असल्याने,. राज्य सरकार व केंद्र सरकारला जागे करण्यासाठी सोमवारी ओबीसी समाजातील लोक आपल्या कुटुंबियासह सोमवारच्या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे सयाजी झुंजार यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हयामधील ओबीसीतील सर्व समाजांना एकत्र करण्याचे काम सुरू आहे. यासाठी ओबीसी जनमोर्चा जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यासाठी सर्वसमावेशक जातीची जंबो कमिटी करण्यात आली असल्याचे माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी सांगून, आपल्या अडचणी व तक्रारी या कार्यालयाकडे द्याव्यात असे आवाहन केले आहे. पत्रकार परिषदेस माजी महापौर मारूतराव कातवरे, ज्ञानेश्वर सुतार, बाबासाहेब काशिद, हाजी मुसा पटवेगार, संभाजी पवार, अशोक माळी,वसंत काजवे,विलास गटे,गणेश बुरसे, सुधाकर पेडणेकर, भरत लोखंडे,ज्योती, हेंमत दुधाणे, सौ. मालती सुतार यांच्यासह ओबीसी जातीचे प्रतिनिधी उपस्थित होते.