अन्य पक्षांमध्ये सामील होण्याचे सत्र
प्रगतिशील समाजवादी पक्ष स्थापन करणाऱया शिवपाल यादव यांचे अनेक सहकारी आता त्यांची साथ सोडून इतर पक्षांमध्ये जात आहेत. समाजवादी पक्षाच्या आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने काही जण भाजप तर काही जण बसपमध्ये सामील होत आहेत. तर काही जण भविष्याचा विचार करून अन्य पक्षांमध्ये दाखल होत आहेत. स्वतः शिवपाल यादव हे समाजवादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढत असल्याने त्यांना स्वतःच्या सहकाऱयांना रोखणे अवघड ठरू लागले आहे.
माजी मंत्री शादाबाद फातिमा आता जहूराबादमधून निवडणूक लढविणार आहेत. याच मतदारसंघात सप आघाडीतील घटक पक्ष सुभासपचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर निवडणूक लढवत आहेत. अशाचप्रकारे अखिलेश यादव सरकारमध्ये मंत्री राहिलेले शिवकुमार बेरिया यांनीही प्रगतिशील समाजवादी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रसपचे मातब्बर नेते आणि दोनवेळा खासदार राहिलेले रघुराज शाक्य देखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. अखिलेश सरकारमध्ये मंत्री राहिलेले शारदा प्रताप यांनीही प्रसप सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
प्रसप संघटनेचे अनेक अन्य पदाधिकारीही पक्ष सोडत आहेत. समाजवादी पक्षासोबत आघाडी झाल्यावर या नेत्यांनी किमान 7-8 जागा मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु स्वतः शिवपाल यादव यांनाच समाजवादी पक्षाकडून एक जागा मिळाली आणि ती देखील सपच्या चिन्हावर. अशा स्थितीत सप सोडून शिवपाल यांच्यासोबत गेलेले अनेक जण निराश झाले आहेत.
आपण मोठे बलिदान केले, आमची 100 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी होती असे म्हणत शिवपाल यांनीच दुःख व्यक्त केले आहे. प्रसपचे निवडणूक चिन्ह चावी काढून घेत निवडणूक आयोगाने त्याच्या बदल्यात स्टुल चिन्ह दिले आहे. आता नव्या चिन्हाद्वारे पक्षाची ओळख पुन्हा निर्माण करणे अवघड ठरणार आहे.









