कबनूर / वार्ताहर
झोपडपट्टी धारकांना शासन परिपत्रकानुसार जागा मिळावी, प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मिळाली पाहिजेत या मागणीसाठी आज कोरोची ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ग्रामपंचायतवर काढण्यात आलेल्या मोर्च्यासाठी पोलिस बंदोबस्त मोठा होता.
कोरोची तालुका हातकणंगले येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी संघटना यांच्या वतीने शुक्रवारी अकरा रोजी धडक मोर्चा ग्रामपंचायत कार्यालय वर काढण्यात आला. माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाची सुरुवात पाण्याची टाकी सिद्धार्थनगर येथून झाली. हा मोर्चा थेट ग्रामपंचायतींवर जाऊन धडक दिली. संतप्त झोपडपट्टीधारकांना आम्हाला हक्काची जागा मिळालीच पाहिजे, घरे मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत होते. ग्रामपंचायतीला झोपडपट्टी संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात कोरोची येथील गटनंबर 1035 मधील झोपडपट्टीधारकांना 16 फेब्रुवारी 2018 शासन परिपत्रकानुसार 500 स्क्वेअर फुट जागा आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मिळालेच पाहिजे असे म्हटले आहे. कोरोची सरपंच रेखा पाटील, उपसरपंच आनंदा लोहार यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. जागा व घराबाबत मागील गावसभेमध्ये हा ठराव झाला होता. त्यानुसार हा प्रलंबित प्रश्न तात्काळ निकालात काढण्यात यावा असे सांगण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर देवानंद कांबळे, माजी तालुका पंचायत सदस्य संतोष भोरे, अण्णा कांबळे, गणेश गुरव, तुकाराम शिंदे यांच्यासह संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.