प्रतिनिधी/मिरज
भारतीय रेल्वेच्या नव्या धोरणानुसार प्रवाशांचा प्रतिसाद नसलेल्या एक्सप्रेस रेल्वे गाड्या रद्द करण्यात येत आहेत त्यानुसार कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्स्प्रेससह कोल्हापूर – मनगुरु , कोल्हापूर – बिदर, कोल्हापूर-सोलापूर, मिरज-हुबळी लिंक एक्सप्रेस, मिरज-पंढरपूर सुपरफास्ट या एक्स्प्रेस कायम स्वरुपी बंद झाल्या आहेत. रेल्वेच्या नवीन धोरणानुसार केवळ हंगामामध्ये फुल्ल व इतरवेळा तोट्यात धावणार्या सर्व एक्सप्रेस व पँसेंजर रद्द करण्यात येत आहेत. कोविड साथीमुळे मार्च २०२० पासून बंद केलेल्या या रेल्वेगाड्या पुन्हा सुरु होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. यापुढे फक्त १५० कि.मी.पर्यंतच पँसेंजर रेल्वे धावणार असून १५० कि.मी.च्या पुढे धावणार्या पॅसेंजरचे एक्सप्रेस मध्ये रुपांतर होणार आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.