ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव आणण्यात येत होता. संबंधितांनी त्यांना तुरूंगात पाठविण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोप केला. सोमय्या यांच्या या आरोपांवर आज संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे.
राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मागील काही दिवसांपासून मी, माझे कुटुंबीय आणि मित्रपरिवारावर निंदनीय आरोप होत आहेत. संबंधितांकडून केंद्रीय यंत्रणांचा केवळ गैरवापर केला जात नसून त्यांचीही बदनामीही होत आहे. या अट्टल खोटारडय़ांना लवकरच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.’
तसेच लक्षात ठेवा, आमचे सरकार पडणार नाही आणि मी झुकणारही नाही! जय महाराष्ट्र!’ असेही संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि वाईन व्यवसायातील भागीदार आहेत. पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करुन मुंबईतील दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलंड येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट मिळवल होते. या कोविड सेंटर्सवर ते डॉक्टर्स पुरवायचे. या माध्यमातून पाटकर यांनी मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. मुंबईत लाईफलाइन हेल्थ केअर जी कंपनी अस्तित्वात नाही. त्याला कोविड सेंटर्सचे कंत्राट ठाकरे सरकारने दिले, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. तसेच या कोविड घोटाळय़ात 80 कोटी रुपये महापालिकेने पेमेंट केलं, 20 कोटींचं दुसरे पेमेंट करत आहे. या संदर्भात नॅशनल डिझायस्टर मॅनेजमेंट ऑथरिटीचे चेअरमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे. या घोटाळय़ाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.