वेगवेगळय़ा पत्त्यांचे आधार कार्ड जप्त ः गुप्तचर यंत्रणाही सतर्क
लखनौ / वृत्तसंस्था
अयोध्येच्या यलो झोनमधून शुक्रवारी एका बांगलादेशी तरुणाला अटक करण्यात आली आहे. संबंधिताच्या हालचालींबाबत पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे वेगवेगळे पत्ते असलेली दोन आधारकार्ड सापडली आहेत. सुमारे 16-17 वर्षांपूर्वीपासून देशात लपून बसलेल्या तरुणाने दिल्लीला आपले आश्रयस्थान बनवले होते. त्याच्याविरोधात अयाध्येमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अयोध्येतील यलो झोन म्हणून ओळख असलेल्या राजघाट येथून संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या बांगलादेशी तरुणाला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. रामनगरी अयोध्येत यलो झोनचा परिसर तीन किलोमीटर परिसरात पसरला आहे. रामलल्ला मंदिर परिसर हा रेड झोन आहे, तर त्याच्या बाहेरील भाग यलो झोनमध्ये येतो. चौकशी-तपासादरम्यान त्याच्याकडे बांगलादेशातून भारतात आल्याचे कोणतेही वैध प्रमाणपत्र मिळालेले नाही. तसेच त्याने आपण अयोध्येची पाहणी करण्यासाठी आल्याची कबुली दिल्याने संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. आता पोलिसांसोबतच गुप्तचर यंत्रणाही त्याची चौकशी करत आहेत. बांगलादेशी तरुणाच्या अटकेनंतर रामनगरीतील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. तसेच जिह्यात घुसखोरी करून बेकायदेशीरपणे राहणाऱयांची गांभीर्याने चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अटक करण्यात आलेला युवक अविनाश चंद्र दास हा बांगलादेशातील चर्होगला मेहंदीगंज वारिसालचा रहिवासी आहे. मात्र त्याच्याकडून सापडलेल्या दोन आधारकार्डमध्ये एकावर दिल्लीतील कटिया बाबा आश्रम डेअरी लिबासपूर आणि दुसऱयावर वृंदावनचा पत्ता आहे. आपण बांगलादेशातून 16-17 वर्षांपूर्वी लपून भारतात आलो असून पूर्वी आपण दिल्लीतील कटिया बाबा आश्रमात राहत होतो असे चौकशीत तरुणाने सांगितले. दिल्लीच्या पत्त्यावर बनवलेले आधार कार्डही त्याच्याकडे सापडले. याप्रकरणी रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









