तरुण भारत ऑनलाइन टीम
कर्नाटकातील हिजाब प्रकरण वाढतच चालला आहे. एवढेच नाही तर हिजाबच्या वादाचे पडसाद इतर राज्यांतही उमटू लागले आहेत. शिवमोग्गा येथील शासकीय पदवी महाविद्यालयात मंगळवारी दोन गटात दगडफेकीची घटना घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले. वाढता विरोध पाहून कर्नाटक सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. त्याचवेळी या प्रकरणी आज कर्नाटक उच्च न्यायालयातही सुनावणी झाली.
या प्रकरणावर आज सलग दुसऱ्या दिवशी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी झाली, मात्र या न्यायालयात कोणताही निर्णय झाला नाही. न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या न्यायालयाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात यावे, असे या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाने सांगितले.








