ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना काळात आपत्कालीन परिस्थितीशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराने संकलित करण्यात आलेल्या पीएम केअर्स फंडातील निधीत 2020-21 या वर्षात तिपटीने वाढ झाली आहे. पीएम केअर्स फंडात 2020-21 मध्ये 10 हजार 990 कोटी रुपये जमा झाले आहेत. यापैकी 7 हजार 183 कोटी रुपये स्वच्छेने केलेली मदत तर 494 कोटी रुपये हे परदेशामधील लोकांनी दिलेले आहेत. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
निवृत्त कमांडर लोकेश बत्रा यांनी पीएम केअर फंडातील जमा निधी आणि खर्च याबाबतची माहिती माहिती अधिकारातून मागवली होती. त्यामध्ये मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये पीएम केअर फंडात 10 हजार 990 कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामधील 3 हजार 976 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. यापैकी 1 हजार 311 कोटी रुपये मेड इन इंडिया व्हेंटीलेटर्सवर खर्च करण्यात आलेत. हे व्हेंटीलेटर्स देशभरातील वेगवेगळय़ा सरकारी रुग्णालयांमध्ये देण्यात आले होते. तर 1 हजार कोटी रुपये राज्यांना स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी देण्यात आले होते.
2019-20 या वर्षात पीएम केअर फंडात 3067.62 कोटींचा निधी जमा झाला होता. दरम्यान, विरोधकांनी या फंडातील रक्कम आणि खर्च पारदर्शक नसल्याचा आरोप केला होता. मात्र, केंद सरकारने हे आरोप फेटाळले होते.