प्रतिनिधी /बेळगाव
आश्रया फौंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था असून ती एचआयव्हीबाधित किशोरवयीन मुलींसाठी काम करते. या फौंडेशनच्या मुलींसाठी व सागरनगर येथील झोपडपट्टीतील मुलांसाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी सीआरपीएफच्या कोब्रा स्कूलला भेट दिली. कोब्रा स्कूलमध्ये सैनिकांना जंगलामधील युध्द व डावपेचाचे प्रशिक्षण देण्यात येते. मुलांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना बिंबविण्यासाठी प्रशिक्षण कसे देण्यात येते. याचे प्रत्याक्षिक दाखवून सैनिक देशभर कशी सेवा करतात ते सांगितले. कोब्रा स्कूलचे उपप्राचार्य एम. एल. रविंद्र यांनी मुलांशी संवाद साधून मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यास प्रोत्साहित केले. उपप्राचार्य एम. एल. रविंद्र व लष्कराधिकारी संदीप शर्मा यांच्या हस्ते मुलांना स्मरणिका देण्यात आल्या.
शेवटी भेटीचा सारांश समजवून सांगण्यासाठी प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले व विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. कोब्रा स्कूलतर्फे मुलांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आश्रया फौंडेशनच्या संस्थापिका नागरत्ना व सल्लागार श्रीजित व सागरनगरचे कार्यकर्ते विष्णू यांनी या सहलीचे आयोजन केले होते.









