मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कार्यकर्ता बैठकीत उद्गार, काणकोण मतदारसंघाचा दौरा
प्रतिनिधी /काणकोण
आगामी सरकार हे भाजपाचेच राहणार असून 2022 साली भाजपाचे 22 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील. त्यात काणकोणच्या रमेश तवडकर यांचा समावेश असेल. तवडकर यांना निवडून द्या, त्यांना मंत्री करण्याची जबाबदारी आपली, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देवाबाग, काणकोण येथे भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
7 रोजी सावंत यांनी तवडकर यांच्या प्रचारार्थ काणकोण मतदारसंघात दौरा केला. या दौऱयात त्यांनी तळपण येथील श्री गणपती देवालय आणि लोलये येथे बैठकांत मार्गदर्शन केल्यानंतर देवाबाग येथे आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्यासमवेत उमेदवार तवडकर, मुंबईचे आमदार गणपतराव गायकवाड, कर्नाटकातील माजी आमदार सुनील हेगडे, सर्वानंद भगत, काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, काणकोणचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो, अन्य नगरसेवक त्याचप्रमाणे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस आणि अन्य पक्षांना आपल्याच उमेदवारांविषयी विश्वास नाही. म्हणून ते देवळात जाऊन शपथा घेतात. आपले सरकार आल्यानंतर काणकोण नगरपालिकेला विशेष दर्जा देतानाच खास निधी दिला जाईल. काणकोण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष तरतूद केली जाईल. हा मतदारसंघ मागास राहणार नाही याकडे आपले सरकार लक्ष देईल, असे आश्वासन सावंत यांनी दिले. अजूनही भाजपाचे जे कार्यकर्ते बाजूला आहेत त्यांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भाजपाचे उमेदवार असलेले तवडकर यांनी केंद्र सरकारच्या खास योजनेतून जी आश्रमशाळेची संकल्पना चालीस लावली आहे त्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.
तवडकर यांनी आपल्या भाषणात स्वयंपूर्ण गोवा, आत्मनिर्भर भारतच्या संकल्पनेतून काणकोण मतदारसंघाचा विकास साधला जाईल, असे सांगितले. नगराध्यक्ष रिबेलो यांनी स्वागतपर भाषणात भाजप आणि मुख्यमंत्री सावंत यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले. बैठकीचे सूत्रसंचालन सिद्धार्थ देसाई यांनी केले.









