पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख: 1984 मध्ये आले होते निवडून
@ वृत्तसंस्था / हैदराबाद
भाजपचे वरिष्ठ नेते सी. जंगा रेड्डी यांचे शनिवारी सकाळी हैदराबादमध्ये निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. भाजपला नव्या उंचींवर नेण्याच्या प्रयत्नांचा ते अविभाज्य घटक होते असे पंतप्रधान म्हणाले. निधनासमयी रेड्डी हे 86 वर्षांचे होते.
सी. जंगा रेड्डी यांनी स्वतःचे पूर्ण जीवन सार्वजनिक सेवेत घालविले. जनसंघ आणि भाजपला यशाच्या नव्या उंचींवर नेण्याच्या प्रयत्नांचे ते महत्त्वाचे घटक होते. त्यांनी लोकांच्या मनात स्थान मिळविले होते. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरित केले होते. सी. जंगा रेड्डी यांच्या निधनाने दुःखी असल्याचे मोदी म्हणाले.
जंगा रेड्डी हे भाजपच्या विकासाच्या अत्यंत नाजुक टप्प्यात पक्षाचा बुलंद आवाज होते असे मोदींनी म्हटले आहे. मोदींनी जंगा रेड्डी यांच्या मुलाशी फोनवरून संपर्क साधत स्वतःच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.
1984 मध्ये संसदेत पोहोचलेल्या भाजपच्या दोन खासदारांमध्ये त्यांचा समावेश आहे. विजय नोंदविणारे भाजपचे दुसरे खासदार ए.के. पटेल होते. त्यांनी गुजरातच्या मेहसाणा येथून विजय मिळविला होता. या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांनाही पराभव पत्करावा लागला होता. रेड्डी यांनी 1984 च्या लोकसभा निवडणुकीत आंध्रप्रदेशच्या हनमकोंडा लोकसभा मतदारसंघात पी.व्ही. नरसिंह राव यांना पराभूत केले होते. पी.व्ही. नरसिंह राव हे पुढील काळात देशाचे पंतप्रधान झाले होते.









