ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या मित्रपरिवाराने मुंबईतील कोविड सेंटरच्या माध्यमातून 100 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.
सोमय्या म्हणाले, सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि वाईन व्यवसायातील भागीदार आहेत. पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करुन मुंबईतील दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलंड येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट मिळवलं. या कोविड सेंटर्सवर ते डॉक्टर्स पुरवायचे. या माध्यमातून पाटकर यांनी मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. मुंबईत लाईफलाइन हेल्थ केअर जी कंपनी अस्तित्वात नाही. त्याला कोविड सेंटर्सचे कंत्राट ठाकरे सरकारने दिले. या ठिकाणी अनेक कोरोनाबाधित रूग्णांचे मृत्यू झाले. या घोटाळय़ात 80 कोटी रुपये महापालिकेने पेमेंट केलं, 20 कोटींचं दुसरे पेमेंट करत आहे. या संदर्भात नॅशनल डिझायस्टर मॅनेजमेंट ऑथरिटीचे चेअरमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे. या घोटाळय़ाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.








