प्रतिनिधी / सातारा :
कोल्हापूर-कागल राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण करण्याकरीता 2009 कोटी रूपये, खंबाटकी दुसऱ्या बोगदयाच्या उर्वरित कामासाठी 493 कोटी आणि कराड-चिपळुण नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी असे मिळुन, रस्त्यांच्या कामासाठी जवळपास 3000 कोटी रूपयांची उपलब्धता करण्यात आली आहे. तर प्रतापगड, अजिंक्यतारा आणि सज्जनगड रोप-वे च्या प्रस्तावाला नितिन गडकरी यांनी तत्वत: मंजूरी देवून पुरेसा निधी देण्याचे मान्य केले आहे. रोप-वे मुळे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक दृष्टया सातारा जिल्हयाच्या विकासाला एक वेगळी उंची आणि चालना मिळणार आहे, अशी माहीती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
खा. उदयनराजे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे की, चालू अधिवेशन काळात, रस्ते वाहतुक आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंत्रालयात सादर केलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करताना, किल्ले अजिंक्यतारा, किल्ले प्रतापगड आणि सज्जनगड या किल्ल्यांवर जाण्यासाठी रोप-वे चा प्रस्तावास नितिन गडकरी यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच प्रदान करण्यात येईल असे त्यांनी सांगीतले आहे.
तसेच राष्ट्रीय महामहार्गाचे शेंद्रे ते कागल टप्प्यातील सहापदरीकरणाचे कामास रूपये 2009 कोटी आणि खंबाटकी बोगदयाच्या उर्वरीत कामासाठी 493 कोटी रूपये, तर चिपळुण ते कराड या नवीन राष्ट्रीय महामार्गासाठी देखिल मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. कामाची निकड आणि आमची मागणी विचारात घेवून, नागरीकांच्या हितासाठी 3000 कोटी रूपयांपेक्षा जास्त निधीची उपलब्धता करून दिल्याबददल गडकरी यांचे आभार मानले.