शहापूर पोलीस ठाण्याचा पोलीस हवालदार पसार
इचलकरंजी/प्रतिनिधी (राजेंद्र होळकर)
दीड हजारांच्या लाचेचे पैसे घेताना यड्राव ( ता. शिरोळ) गावच्या पोलीस पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला. जगदिश संकपाळ ( रा. यड्राव, ता. शिरोळ) असे त्याचे नाव आहे. तर लाचेचे पैसे मागणारा शहापूर पोलिस ठाण्याचा पोलीस हवालदार आसिफ शिराजभाई ( रा. जवाहरनगर, इचलकरंजी) पसार झाला. ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी केली.
यड्राव ( ता. शिरोळ) परिसरातील एका व्यक्तीने न्यायालयीन दिलेले फर्मान चुकविले. त्यामुळे त्या संबधीत व्यक्ती विरोधी ताबा (अटक वारंट) आदेश काढला आहे. असे ताबा (अटक वारंट) आदेश करण्याचे काम शहापूर पोलिस ठाण्याचा पोलीस हवालदार आसिफ शिराजभाई यांच्याकडे आहे. त्यांने त्या संबंधीत व्यक्तीकडे अटक करण्याबाबत दोन हजार पाचशे रुपयाच्या लाचेच्या पैश्याची मागणी यड्राव ( ता. शिरोळ) गावचा पोलीस पाटील जगदिश संकपाळ यांच्या मदतीने केली. या लाचेच्या मागणी पैकी एक हजार रुपये त्यांनी दोन दिवसापूर्वी स्विकारले. तर उरलेल्या दीड हजारासाठी त्यांनी संबंधीत व्यक्तीकडे तगादा लावला. त्यामुळे त्यांने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्याकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी करुन, पोलीस उपाअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी सापळा रचला. यावेळी पोलीस हावलदार आसिफ शिराजभाई याच्या सांगण्यावरून पोलीस पाटील जगदिश संकपाळ लाचेचे दीड हजार रुपये स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सकाळी रंगेहाथ पकडले.
या कारवाईची चाहूल लागताच शहापूर पोलीस ठाण्याचा पोलीस हवालदार आसिफ शिराजभाई ( रा. जवाहरनगर, इचलकरंजी) हा त्वरीत पसार झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याचा शोध सुरु केला असून, त्याचा मोबाईल नॉट रिचेबल लागत आहे.