महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी हालचालींना वेग : निवडणूक प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार
प्रतिनिधी / बेळगाव
महापौर उपमहापौर निवडणुकीच्या आरक्षणाबाबत निर्माण झालेली अडचण दूर झाली आहे. प्रशासनाने आरक्षणाचे स्पष्टीकरण दिले पण अधिकृत प्रत महापालिकेला उपलब्ध झाली नव्हती. बुधवारी सायंकाळी अधिकृत प्रत मिळाल्याने महापौर, उपमहापौर निवडणुकीची मतदार यादी तयार करण्यासह आवश्यक तयारी सुरू झाली आहे.
महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. नगर विकास खात्याने आरक्षणाचे स्पष्टीकरण दिल्यानंतर अधिकृत प्रत महापालिकेला पाठविली नव्हती. परिणामी निवडणुकीबाबत तांत्रिक मुद्दा निर्माण झाला होता. त्यामुळे निवडणूक घेण्यासाठी महापालिकेला स्पष्टीकरणाच्या अधिकृत पत्राची प्रतीक्षा होती. अखेर बुधवारी सायंकाळी अधिकृत प्रत मिळाली असून 2018 मध्ये जाहीर केलेल्या एकविसाव्या कार्यकालावधीनुसार निवडणूक घेण्याचे आदेश बजावले आहेत.
महापौरपद सामान्य महिला आणि उपमहापौरपद मागास-ब महिलेकरिता राखीव आहे. नगर विकास खात्याने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यात येणार आहे. यादृष्टीने महापालिकेने तयारी सुरू केली आहे. महापौर-उपमहापौर निवडणूक प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रादेशिक आयुक्तांकडून निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. तारीख ठरविण्यासाठी प्रभारी प्रादेशिक आयुक्तांकडे फाईल सादर करण्यात येणार आहे. याकरिता मतदार यादी तयार करण्यासह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता प्रादेशिक आयुक्तांकडे महापालिकेच्या विभागाकडून करण्यात येणार आहे. याची तयारी कौन्सिल विभागाने चालविली आहे. त्यामुळे लवकरच महापौर उपमहापौर निवडीची तारीख जाहीर होण्याची शक्मयता आहे.
महापौर-उपमहापौर निवडणुकीबाबत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापौर, उपमहापौर निवडणुकीची तयारी सुरू झाल्याने गटांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. महापौरपद सामान्य महिलेसाठी राखीव असल्याने लिंगायत समाजाला प्राधान्य द्यावे अशा मागणीचे सुर उमटू लागले आहेत. तसेच काहीनी यापूर्वीच तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडीची तारीख कधी जाहीर होणार? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.