नवी दिल्ली / प्रतिनिधी
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मेरठहून दिल्लीला जाणाऱ्या खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. याबाबतचे ट्विट ओवेसी यांनी केले आहे. या ट्विटमध्ये सांगितले की, गाझियाबादच्या डासना येथे त्यांच्या कारवर 3-4 राऊंड गोळीबार करण्यात आला. त्यानी स्वत: सुरक्षित असल्याचे सोशल मिडीयावर घोषित केले आहे तसेच ओवेसी यांनी कारमध्ये गोळ्यांच्या खुणा दाखविणारा एक फोटोही शेअर केला आहे.
ओवेसी यांनी ट्विटरवर लिहिले की, “काही वेळापूर्वी चिजारसी टोल गेटवर माझ्या कारवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. 4 राऊंड गोळीबार करण्यात आला. तेथे ३-४ जण होते, सर्वजण शस्त्रे तेथेच सोडून पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, पण मी दुसऱ्या गाडीत बसून निघालो. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. अलहमदुलिल्लाह.” पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
ओवेसी यांनी दिल्ली येथे पोहोचल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना घटनेची संपूर्ण माहिती दिली. पिलखुआच्या टोलगेटजवळ कारचा वेग कमी झाला, त्यादरम्यान मोठा आवाज झाला. गाडीत बसलेल्या लोकांनी आपल्यावर हल्ला झाल्याचे सांगितले. आमच्या गाडीवर बुलेटच्या खुणा आहेत. बुलेटमुळे गाडी पंक्चर झाल्यामुळे उड्डाणपुलाजवळ गाडी बदलून दिल्लीपर्यंत पोहोचलो.