प्रतिनिधी /फोंडा
अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी एका युवकाला साकवार-बोरी येथून फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले. ओमकार राजेंद्र पाटील (वय 21,सर्फराज गॅरेजजवळ हवेली कुर्टी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी काल मंगळवारी पहाटे केलेल्या धडक कारवाईमध्ये त्याच्याकडून दोन किलोग्राम वजनाचा अंदाजे रू. 2 लाख किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर संशयित युवक बोरी येथे अमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे फोंडा पोलिस त्याच्यावर पाळत ठेऊन होते. साधारण 2 किलोग्राम वजनाच्या गांजासह त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस निरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परेश सिनारी, सुरज काणकोणकर, हवालदार केदारनाथ जल्मी, वंदेश सतरकर, सूरज गावडे, कॉन्स्टेबल अमेय गोसावी, किरण, योगेश, मोहम्मद शरीफ, महेश गावडे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी गांजाविषयी मुंख्य स्रोतापर्यत पोहोचण्यास पोलिसांचे अजूनपर्यत यश आलेले नाही. सदर संशयिताला अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून एक दिवसांच्या रिमांडवर पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.









