98 हजार 677 हेक्टरचे नुकसान : 94.80 कोटी मंजूर, उर्वरितांना दिली जातेय भरपाई
प्रतिनिधी /बेळगाव
गतवर्षी अतिपावसामुळे हजारो हेक्टरमधील पिकांना मोठा फटका बसला होता. जिल्हय़ातील 98,677 हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला होता. विशेषतः भात, ऊस, बटाटा, भुईमूग, मका, ज्वारी, उडीद, तूर, सोयाबिन, सूर्यफुल आदी पिकांचे नुकसान झाले होते. आतापर्यंत जिल्हय़ातील 1 लाख 9 हजार 428 शेतकऱयांना 94.80 कोटी नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्या दरम्यान झालेल्या अतिपावसामुळे खरीप हंगामातील पिकांबरोबर फळ पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तर अवकाळी पावसाचाही पिकांना फटका बसला होता. दरम्यान कृषी खाते, बागायत खाते आणि महसूल खात्यामार्फत नुकसानग्रस्त शेतीचा सर्क्हे करण्यात आला होता. ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यात सर्व्हेचे काम झाले होते. आता नुकसानभरपाई देण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
कृषी खात्याकडून नुकसान झालेल्या बागायत क्षेत्राला प्रति हेक्टर 13600 तर इतर पिकांना प्रति हेक्टर 6800 नुकसानभरपाई दिली जात आहे. मागील दोन वर्षात अतिपावसामुळे शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे.
पावसाळय़ा दरम्यान विविध पिकांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान शेतकऱयांकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. मात्र शासनाकडून तुटपुंजी भरपाई दिली जात आहे. शेती पिकांचे नुकसान अधिक प्रमाणात तर शासनाकडून मिळणारी भरपाई केवळ तुंटपुजी त्यामुळे भरपाईचा ताळमेळ बसणे अवघड असल्याचेही शेतकऱयांतून बोलले जात आहे.
जिल्हय़ातील 1 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना भरपाई मिळाली असून उर्वरित नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जात आहे. नुकसानग्रस्त शेतकऱयांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा केली जात आहे. यंदा खरीपसह रब्बी हंगामातील पिकांनादेखील फटका बसला आहे. मसूर, वाटाणा, ज्वारी व भाजीपाला पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील उत्पादनावरही परिणाम होणार आहे.
सर्व्हेनुसार प्रति हेक्टर भरपाई
पावसाळय़ादरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱयांच्या नावावर नुकसान भरपाई जमा केली जात आहे. सर्व्हेनुसार प्रति हेक्टर भरपाई दिली जात आहे. बागायत क्षेत्राबरोबर इतर नुकसान झालेल्या पिकांना भरपाई दिली गेली आहे.
– शिवनगौडा पाटील (सहसंचालक कृषी खाते)









