याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
प्रतिनिधी /पणजी
मडगावचे आमदार दिगंबर कामत हे सरकारी कंत्राटदार आहेत. सरकारी कामांच्या अनेक निविदा त्यांनी घेतल्याने ते विधानसभा निवडणूक लढवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा निवडणूक अर्ज फेटाळण्यात यायला हवा व आमदार म्हणून त्यांना अपात्र करायला हवे, अशी याचना करून शिरीष कामत यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर याचिका सादर केली आहे.
शिरीष कामत यांनी यापूर्वी 2020 साली उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय न्यायपीठासमोर याचिका सादर केली होती. त्यात 2017 च्या विधानसभा निवडणुकीत मडगाव मतदारसंघातून निवडून आलेले दिगंबर कामत अपात्र कसे ठरू शकतात याचा तपशील दिला होता. सदर याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने 2020 साली दिगंबर कामत यांना नोटीस बजावली होती.
ही याचिका अनेकवेळा सुनावणीस आली पण मागच्या आठवडय़ात सदर याचिका सुनावणीस आली तेव्हा निवडणूक अपात्रता आव्हान याचिका द्विसदस्य न्यायपीठासमोर सुनावणीस यायला हवी, त्यावर एक सदस्यीय न्यायपीठ सुनावणी होऊ शकत नसल्याचा मुद्दा समोर आला.
याचिका द्विसदस्यीय न्यायपीठासमोर ठेवण्याचा आदेश न्यायमूर्तीनी दिल्यावर आता सदर याचिका आज मंगळवार 1 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदाच द्विसदस्यीय न्यायपीठासमोर सुनावणीस येणार आहे. न्या. महेश सोनक व न्या. आर. एन. लड्डा यांच्या न्यायपीठासमोर सदर याचिका सुनावणीस येणार आहे. ऍड. नायजेल दा कॉस्ता याचिकादाराच्यावतीने बाजू मांडणार आहेत.









