प्रतिनिधी /पणजी
विधानसभा निवडणुका जाहीर होऊन आता दि. 14 फेब्रुवारी रोजी मतदानही होणार आहे. अशा परिस्थितीत सभापतींनी पात्र ठरवलेल्या 10 आमदारांच्या पात्रतेला आव्हान दिलेल्या गिरीश चोडणकर यांच्या आव्हान याचिकेवर गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयात आज मंगळवार दि. 1 फेब्रुवारी रोजी सुनावणी सुरु होत आहे.
याचिकादार गिरीश चोडणकर यांच्यावतीने ऍड. अभिजित गोसावी बाजू मांडणार आहेत. या याचिकेसोबत गोवा फॉरवर्ड पक्षाच्या वतीने दुर्गादास कामत यांनी सादर केलेली हस्तक्षेप याचिकाही सुनावणीस येणार आहे. न्या. मनिष पितळे व न्या. आर. एन. लड्डा यांच्या द्विसदस्यीय न्यायपीठासमोर सदर याचिका दुपारी 2.30 वाजता सुनावणीस येणार आहे.
या याचिकेत उत्तर प्रत्युत्तर पूर्ण झाले असून फक्त युक्तिवाद मांडणे बाकी आहे. मागच्या सुनावणीवेळी न्यायपीठाने वादी प्रतिवाद्यांच्या वकिलांना प्रश्न केला करुन प्रत्येक वकील किती वेळ घेणार ते स्पष्ट करण्यास सांगितले होते. निवाडय़ापर्यंत ही सुनावणी होणार असल्याचेही न्यायपीठाने स्पष्ट केले आहे.
पुरवणी याचिका सादर होणार ही सुनावणी मतदानानंतर घेण्यात यावी, कारण या सुनावणीचा परिणाम मतदानावर होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करून प्रतिवाद्यांच्या वतीने उच्च न्यायालयासमोर पुरवणी अर्ज सादर होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या 10 आमदारांना अपात्र ठरवण्यात आल्यास किंवा पात्र ठरवले तरी त्याचा फायदा किंवा नुकसान त्यांना भोगावे लागणार आहे. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी होण्याची शक्यता आहे. यावर याचिकादार गिरीश चोडणकर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून रहाणार आहे.








