तदबीर से बिगडी हुई, तकदीर बना ले , अपने पे भरोसा है तो एक दाँव लगा ले….
1951साली प्रदर्शित झालेल्या बाजी या चित्रपटातील हे गीत साहिर लुधियानवी यांनी जगातल्या प्रत्येकाला स्वतःवर विश्वास दाखवून कसोटीच्या प्रसंगी एक विजयी खेळी करण्यासाठीच लिहिले असावे. आयुष्याच्या एका वळणावर यश हुलकावण्या देऊ लागते. ‘सहज पार करू’ हा विश्वास ढळू लागतो. आणि पाय लटपटायला लागतात तेव्हा समोरच्या आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरे जा असे अंतर्मन सांगते आणि तो आत्मविश्वास विजयश्री खेचून आणतो. संकटे आणि प्रतिकूल परिस्थिती पराभूत होते तेव्हा ते यश एका जिद्दीने खेचून आणलेले असते. स्पेनच्या राफेल नदालने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, ऑस्ट्रेलियन ओपन अजिंक्मपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तब्बल पाच तास चोवीस मिनिटांचा खेळ करून आपल्या आयुष्यातील एकविसाव्या ग्रँडस्लॅम चषकावर विश्वविक्रमी नाव कोरले. जगातील सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा खेळाडू अशी त्याची आता नोंद झाली आहे. 13 प्रेंच ओपन जिंकून क्ले कोर्ट अर्थात लाल मातीच्या टेनिस मैदानाचा सम्राट असलेल्या राफेल नदालने रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच या आपल्या दोन प्रतिस्पर्ध्यांच्या प्रत्येकी 20 ग्रँडस्लॅम जिंकल्याच्या बरोबरीला मागे टाकले. हे त्याचे यश साधेसुधे नाही. त्यासाठी आयुष्याने त्याची कसोटी पाहिली. आता हा संपला, खेळूही शकणार नाही अशा चर्चांना पूर्णविराम देऊन, आणि सहा महिन्यांच्या पायाच्या दुखापतीच्या दुखण्याला पराभूत करून तो पुन्हा उभा राहिला. टेनिस हा खेळ पायाची सत्वपरीक्षा बघणारा. त्यात शेवटचे ग्रँडस्लॅम जिंकून दोन वर्षे झालेली. कोरोनामुळे सराव थांबलेला. या दोन वर्षात प्रतिस्पर्धी जोकोविचने 17 वरून 20 ग्रँडस्लॅम जिंकून स्वतःचे आव्हान आणखी गडद केले असताना 35 वषीय नदालला पुन्हा स्वतःला सिद्ध करायचे होते. त्याने ते करून दाखवले! रविवारी मेलबर्नमध्ये जो सामना झाला, तो कधीही न विसरता येणारा म्हटला पाहिजे. नदालने अंतिम सामन्यात रशियाच्या युवा मेदवेदेवला नमवून जेतेपद पटकावले. या सामन्यात दोन उत्कृष्ट टेनिसपटूंच्या अद्भुत खेळाला पाहण्याची संधी जगाला मिळाली. दोघांनाही विक्रमी जेतेपद खुणावत होते. नदाल मोठी लढाई लढून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होताच पण गेल्यावषी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धा जिंकणाऱया मेदवेदेवला सुद्धा सलग दुसऱया ग्रँडस्लॅम अजिंक्मयपदाची संधी खुणावत होती. त्याने आक्रमक आणि दिमाखदार सुरुवात केली. पहिले दोन सेट त्याने 6-2 आणि 7-6(5) असे जिंकले होते. आता याची विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली, असेच सर्वांना वाटत होते. पण जिगरबाज नदालने मेदवेदेववर 2-6, 6-7 (5-7), 6-4, 6-4, 7-5 अशी मात केली. ही ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱया क्रमांकाची दीर्घ लढत ठरली. पस्तीस वषीय नदालने तेरा वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे अजिंक्मयपद पटकावले होते. यापूर्वी 2012 मध्ये जोकोविच आणि नदाल यांची तब्बल पाच तास 53 मिनिटांची लढत ऑस्ट्रेलियन ओपनला होऊन जोकोविचने त्याला पराभूत केले होते. चार वेळा त्याला येथे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. संपूर्ण आयुष्यात 29 वेळा अंतिम फेरी गाठून त्यातील 21 वेळा विजेतेपद पटकावले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याचा खडतर प्रवास सुरू होता. आता निवृत्ती घ्यावी की काय? असे त्यालाही वाटून गेले होते. लोकही तसे बोलू लागले होते. आपल्याकडे सचिन तेंडुलकरच्या बाबतीत असे वारंवार बोलले जायचे. निवृत्ती कधी घेणार? यावर चर्चा घडवली जायची. जगातील कोणताही जिगरबाज खेळाडू अशा चर्चांवर आपल्या खेळाने मात देतो. 2003 आणि 2011 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सचिन अशाच पद्धतीने उसळून खेळला. असेच आव्हान नदालसमोर होते. दुखापतीमुळे आणि कोरोनामुळे त्याच्या सरावावर मर्यादा आल्या होत्या. पण तरीही तो जिंकला. विजेतेपदाचे चषक स्वीकारल्यानंतर त्याने मनातल्या भावना बोलून दाखवल्या. तो म्हणाला, दीड महिन्यांपूर्वी मी पुन्हा टेनिस खेळू शकेल याबद्दल साशंकता होती आणि आज माझ्या हातात अजिंक्मयपदाचे चषक आहे. या क्षणासाठी किती मेहनत घेतली याची कल्पना कोणी करू शकत नाही. हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक आहे. प्रेक्षकांनीही खूप पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचेही नदालने आभार मानले. अर्थात या स्पर्धेत त्याच्याविरोधात नोव्हाक जोकोविच नव्हता. हे कारण जोकोविचचे चाहते देऊ शकतील. कोरोनाची माहिती लपवल्यामुळे ऑस्ट्रेलियाने त्याचा व्हिसा नाकारला होता. प्रकरण न्यायालयात गेले, मात्र तेथेही त्याला दिलासा मिळाला नाही. त्यामुळे नशिबाचे फासे नदालच्या बाजूने पडले असे म्हणावे तर या निर्णयाचा फायदा होऊन मेदवेदेवसुद्धा वर आलाच होता. त्यामुळे नदालला आव्हान नव्हते असे नाही. त्याच्या इच्छाशक्तीने तो जिंकत गेला. अंतिम सामन्यात पोहोचला तेव्हा त्याच्यापेक्षा दहा वर्षाने कमी वयाच्या आणि तडफेच्या मेदवेदेव बरोबर त्याची स्पर्धा होती. प्रतिस्पर्धी किती तयारीने उतरला होता ते साडेपाच तासाच्या झुंजीने दिसूनच आले. म्हणजे केवळ दैव बलवत्तर होते म्हणून नदाल ही स्पर्धा जिंकलेला नाही. त्याने आपल्या इच्छाशक्ती बरोबरच आपला अनुभव पणाला लावला आणि जिंकला. आता त्याच्यासमोर त्याच्या हक्काची प्रेंच ओपन आहे. जी त्याने तेरा वेळा जिंकली आहे. पुढच्या प्रत्येक मैदानावर त्याची आणि जोकोविचची गाठ पडणारच आहे. पहिल्या क्रमांकासाठी ते दोघे झुंजताना पाहण्याची पर्वणी टेनिस रसिकांना मिळणार आहे. एका अर्थाने या दोन्ही खेळाडूंना निवृत्ती पासून या स्पर्धेने रोखले. पुढची अजून काही वर्षे रसिकांना उपलब्ध झाली. नदालने स्वतःवरच एक डाव लावला, खेळला आणि जिंकला! हे त्याचे मोठेच यश! प्रत्येकाला प्रेरणा देणारे!








