मुंबई
मागच्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये सोन्याची मागणी ही लक्षणीय राहिली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता ही वाढ 78 टक्के अधिक असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सीलने नुकत्याच सादर केलेल्या आपल्या अहवालातून सोन्याच्या मागणीचा कल स्पष्ट केला आहे.
मागच्या वर्षी भारतात 797.3 टन सोन्याची विक्री झाली आहे. याआधीच्या वर्षी मात्र कोरोनामुळे सोन्याच्या विक्रीवर नकारात्मक प्रभाव दिसला होता. 2020 साली नाममात्र 446.4 टन इतके सोने विक्री झाले हेते. संस्थेच्या मते सोन्याची मागणी जशी राहिली तितकीच किंवा किंबहुना जास्तच सोन्याची मागणी यंदा राहण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.
800 ते 850 टन खप अपेक्षीत
कोरोनाचा परिणाम जर का फिका पडला, अशीच उत्साहवर्धक परिस्थिती राहिली तर यावर्षी 800 ते 850 टन इतक्या सोन्याची विक्री होण्याचा अंदाज वर्ल्ड गोल्ड कौन्सीलने केला आहे. मागच्या वर्षी सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत 93 टक्के इतकी वाढ दिसली आहे. चौथ्या तिमाहीत अर्थात ऑक्टोबर-डिसेंबर 2021 मध्ये लग्न व सणामुळे 256 टन इतक्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी झाल्याचे दिसले.
विक्रमी स्तरावर मागणी
मूल्यामध्ये पाहता मागच्या वर्षी 2.61 लाख कोटी रुपयांच्या दागिन्यांची विक्री झाली होती. त्याच्या मागच्या वर्षी 1.33 लाख कोटी रुपयांच्या दागिन्यांची विक्री झाली होती. ऑक्टोबर-डिसेंबर 2021 काळात सोन्याची मागणी ही 8 वर्षाच्या कालावधीनंतर विक्रमी स्तरावर नोंदली गेली.
अर्थसंकल्पाकडून अपेक्षा
बजेटकडून अनेक क्षेत्रांनी सवलतीची मागणी केली असून सराफी व्यवसायानेही आपल्या मागण्या अर्थमंत्र्यांकडे ठेवल्या आहेत. त्यात रत्न आणि दागिने उद्योगाशी संबंधीत अखिल भारतीय रत्न आणि दागिने संघटनेने सरकारकडे जीएसटी दर घटवून 1.25 टक्के करण्याची मागणी केली आहे. सध्या रत्न व दागिन्यांवरचा जीएसटी दर 3 टक्के आहे. सध्याला 2 लाखावरील दागिने खरेदीवेळी पॅन कार्ड दाखवावे लागते, ती रक्कम मर्यादा 5 लाख करण्याची मागणी करण्यात आली आहे.









