रस्ता अरुंद असल्याची ग्रामस्थांची तक्रार
वार्ताहर /उचगाव
सावगाव-मंडोळी मार्गावरील बेनकनहळ्ळी क्रॉस ते सावगाव गावामध्ये प्रवेश करणाऱया रस्त्याचे डांबरीकरण आणि गटारीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने करण्यात येत आहे. मात्र, निविदेप्रमाणे 11 मीटर रस्त्याची रुंदी असताना 9 मीटर रुंदीचा रस्ता करण्यात येत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर आहे.
बेनकनहळ्ळी क्रॉस ते सावगाव हा 1 किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत खराब झाल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाशीवर्गातून करण्यात आली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या एका बाजूची गटार सध्या पूर्ण करण्यात आली असून गटार ते मधल्या अंतराचा रस्ता 11 मीटर असताना सदर रस्ता 9 मीटर करत असल्याने ग्रामस्थांनी याबाबत तक्रार करूनदेखील कंत्राटदाराने 9 मीटरच रस्ता करण्याचे काम हाती घेतले आहे. गावात प्रवेश करणारा महत्त्वाचा मार्ग तसेच मंडोळी-हंगरगा या गावांना जाणारा मार्ग असल्याने या मार्गावर नेहमी रहदारी अधिक असते. यासाठी सदर रस्ता 11 मीटरचा होणे गरजेचे आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असलेले विद्युतखांब काही ठिकाणी मध्ये येत असल्याने पुन्हा त्या ठिकाणी 9 मीटरवरून 8 मीटर रस्ता करण्यात येत आहे. एकंदरीत असलेल्या रस्त्याची दुर्दशा करण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रास्तारोकोचा इशारा
निविदेप्रमाणे 11 मीटर रुंदीचा रस्ता करण्यात यावा, तसेच या रस्त्याच्या दुतर्फा येणारे विद्युत खांब हटविण्यात यावेत, संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवावा, अशी मागणी नागरिक व प्रवाशीवर्गाने केली आहे. सदर रस्त्याचे काम निविदेप्रमाणे व दर्जेदार झाले नाही तर रास्तारोको करू, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य गणपत पाटील, जि. पं. माजी सदस्य निंगाप्पा मोरे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.