लेख क्र-3
आपल्या भारतीय संस्कृतीत अनंत काळापासून अनेक संत-महंत झालेले आहेत. स्थिती आणि काळानुसार त्यांनी केवळ भारतीय समाजालाच उत्तम मार्गदर्शन केलेले नसून संपूर्ण मानव समाजाला त्यांनी सन्मार्ग दाखवलेला आहे. श्रीसमर्थांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास “मरावे परी कीर्ती रूपे उरावे।’’ ह्याप्रमाणे महषी वाल्मीकिंपासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत सगळे सत्पुरुष अजरामर
आहेत.
मनुष्यप्राणी जेव्हा जेव्हा सत्याच्या, सन्मार्गाच्या वाटेवरून दूर झाला आहे तेव्हा तेव्हा ह्या मनुष्यप्राण्याला सत्य आणि सन्मार्गावर आणण्याचे महत्कार्य ह्याच संतांनी आणि सत्पुरुषांनी केले आहे. मानवसमाजाचे खऱया अर्थाने समर्थ नेतृत्व ह्याच सत्पुरुषांनी केले आहे. कारण त्यांच्या ठाई असलेला निःस्वार्थपणा, मनुष्यप्राण्याच्या उत्कर्षासाठी असलेली तळमळ आणि भगवंताविषयीचे प्रेम ह्यामुळेच ते जगभरातील सर्वच लोकांचे कल्याण करू शकले.
श्रीसमर्थांनी श्रीमददासबोध ग्रंथाच्या सुरुवातीलाच आध्यात्मिक क्षेत्रातील समर्थ नेतृत्व कसे असते हे सांगितले आहे. श्रीसमर्थ ग्रंथारंभी सदगुरुस्तवनांत असे म्हणतात की,
“ कां सरिता गंगेसी मिळाली ।
मिळणी होतां गंगा जाली ।
मग जरी वेगळी केली ।
तरी होणार नाहीं सर्वथा ।।
परी ते सरिता मिळणीमागें ।
वाहाळ मानिजेत जगें ।
तैसा नव्हें शिष्य वेगें ।
स्वामीच होये ।।01/04/13-14’’
ह्याचा अर्थ असा आहे की,
जशी लहान नदी गंगेला मिळाली की गंगामय होते. गंगेला मिळण्यापूर्वी लोकं तिला ओढा म्हणत. पण गंगेला मिळाल्यावर तिला वेगळे काढता येत नाही. त्याचप्रमाणे, सदगुरूंची भेट होताच गुरुकृपेने कायापालट होतो आणि शिष्यास सदगुरूंचा अधिकार प्राप्त होऊन सदगुरूपदास पोहोचतो.
पुढे श्रीसमर्थ असे म्हणतात की,
“चिंता मात्र नाहीं मनीं।
कोण पुसे चिंतामणी ।
कामधेनूचीं दुभणीं ।
निःकामासी न लगती ।।
सदगुरु म्हणो लक्ष्मीवंत ।
तरी ते लक्ष्मी नाशिवंत ।
ज्याचे द्वारिं असे तिष्टत ।
मोक्षलक्ष्मी ।।01/04/26-27’’
ह्याचा अर्थ असा आहे की,
सदगुरूला चिंतामणी किंवा कामधेनूची उपमा देता येत नाही. कारण सर्व चिंतांचे निराकरण करण्याचे सामर्थ्य सद्गुरूमध्ये असते. त्यामुळे शिष्यास कसलीच चिंता नसल्याने त्यास कामधेनूचे दुभते निरसच वाटते. सदगुरूला नाशीवंत लक्ष्मीचीही उपमा देता येत नाही. कारण मोक्षलक्ष्मी सदैव सदगुरूच्या दारात ति÷त उभी असते.
संतस्तवनांत श्रीसमर्थ असे म्हणतात की,
“ महाराजे चक्रवती । जाले आहेत पुढे होती ।
परंतु कोणी सायोज्यमुक्ती ।
देणार नाहीं ।। जें त्रैलोकीं नाहीं दान ।
तें करितीं संतसज्जन । तयां संतांचे महिमान ।
काय म्हणौनि वर्णावें ।। जें त्रैलोक्मयाहून वेगळें ।
जें वेदश्रुतीसी नाकळे । तेंचि जयाचेनि वोळे ।
परब्रम्ह अंतरिं ।। ऐसी संतांची महिमा ।
बोलिजे तितुकी उणी उपमा ।
जयांचेनि मुख्य उपमा ।
प्रगट होये ।। 01/06/23-24-25-26’’
ह्याचा अर्थ असा आहे की,
आतापर्यंत अनेक दानशूर राजे-महाराजे झाले आहेत आणि पुढेही होतील पण सायुज्यमुक्ती कोणीही देणार नाही. त्रैलोक्मयात जे दान कोणीही देऊ शकत नाही ते संतसज्जन देतात. त्यांचा महिमा कोणत्या शब्दांनी वर्णावा? तिन्ही लोकांहुन वेगळे आणि वेदांसही न आकळणारे परब्रम्ह संतकृपेने साधकाच्या अंतरंगात प्रकट होते. म्हणून संतांविषयी जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे.
श्रीसमर्थांनी अगदी सोप्या आणि सर्वांना समजेल अशा शब्दांत आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी पुरुषांच्या समर्थ नेतृत्वाविषयी श्रीमददासबोध ग्रंथात सांगितले आहे.
श्री समर्थ श्रोतेस्तवन या समासात असे म्हणतात की,
हे तों प्रीतीचें लक्षण ।
स्वभावेंची करी मन ।
तैसे तुम्ही संतसज्जन ।
मायेबाप विश्वाचे ।।
माझा आशय जाणोनी जीवे ।
आतां उचित तें करावे ।
पुढे कथेसी अवधान द्यावे।
म्हणे दासानुदास ।।
याचा अर्थ असा आहे की, हे प्रेमाचे आणि वात्सल्याचे लक्षण मानले जाते. तुम्हा संतांचे अंतःकरण मला सहजपणे मार्ग दाखवेल. आपण सर्वजण संतसज्जन आहात. संपूर्ण विश्वाचे मायबाप आहात. मला जे म्हणायचे आहे ते आपण जाणता आहात. जे काही उचित असेल ते करावे आणि पुढील कथा मनापासून लक्ष देऊन ऐकावी अशी हा दासांचा दास आपल्याला प्रार्थना करतो आहे. -माधव श्रीकांत किल्लेदार








