ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम – नदालला विक्रमाची संधी,
वृत्तसंस्था/ मेलबर्न
रशियाचा डॅनील मेदवेदेव्ह व स्पेनचा राफेल नदाल यांनी ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले असून रविवारी त्यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. इटलीचा मॅटेव बेरेटिनी व ग्रीसचा स्टेफानोस सित्सिपस यांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. मिश्र दुहेरीत प्रथमच एकत्र खेळणाऱया क्रिस्टिना म्लाडेनोविक व इव्हान डोडिग यांनी जेतेपद पटकावले.
जागतिक द्वितीय मानांकित मेदवेदेव्हने चौथ्या मानांकित सित्सिपसवर 7-6 (7-5), 4-6, 6-4, 6-1 अशी मात करीत सलग दुसऱया वर्षी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. रविवारी जर मेदवेदेव्हने जेतेपद मिळविले तर पहिली सलग दोन ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविणारा तो खुल्या युगातील पहिला टेनिसपटू बनेल. गेल्या सप्टेंबरमध्ये त्याने अमेरिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळवित पहिले ग्रँडस्लॅम पटकावताना जोकोविचचे कॅलेंडर ग्रँडस्लॅम मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळविले होते आणि आता तो नदालचा सर्वाधिक 21 ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम रोखण्याच्या मार्गावर आहे.
नदालचा बेरेटिनीवर विजय
35 वर्षीय नदालने सहाव्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून त्याने शुक्रवारी इटलीच्या मॅटेव बेरेटिनीचे आव्हान 6-3, 6-2, 3-6, 6-3 असे संपुष्टात आणले. दुखापती आणि कोव्हिडची लागण यातून सावरल्यानंतर नदाल या स्पर्धेत उतरला होता. त्यामुळे या स्पर्धेत कुठवर मजल मारणार, याची त्यालाही जाणीव नव्हती. येथे येण्याआधी त्याने एक स्पर्धा जिंकली होती आणि आता वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅममध्ये सलग सहा सामने जिंकले आहेत. येथे त्याने जेतेपद मिळविल्यास ते त्याचे विक्रमी 21 वे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद असेल. याशिवाय चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा दोनदा जिंकणारा तो चौथा टेनिसपटू होईल. सध्या नदाल, फेडरर व जोकोविच या तिघांनीही 20 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत.
रॉड लेवर एरिनावर झालेली ही लढत बंदिस्त छताखाली खेळविण्यात आली. मुसळधार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. नदालचा हा टूर स्तरावर हार्डकोर्टवरील 500 वा विजय होता. येथील स्पर्धा त्याने फक्त एकदा जिंकली असून 2009 मध्ये त्याने हे यश मिळविले होते. त्यात आता आणखी एका जेतेपदाची भर घालण्याचा त्याचा इरादा आहे. ‘कारकिर्दीत अनेकदा दुखापती झाल्यामुळे दुर्दैवाने मला येथे जास्त यश मिळविता आले नाही. काही वेळा मी अंतिम फेरीही गाठली होती. पण सुदैवानेच मी एकदा येथे यश मिळविले असून 2022 मध्ये पुन्हा एकदा ही स्पर्धा जिंकण्याची मला संधी मिळेल, असा विचारही केला नव्हता,’ अशा भावना नदालने व्यक्त केल्या.
पहिल्या दोन सेटमध्ये नदालने बेरेटिनीचे पहिले सर्व्हिस गेम्स भेदले आणि तिसरा सेट गमविल्यानंतर नंतरचा सेट जिंकून तीन तासाच्या आत बेरेटिनीचे आव्हान संपुष्टात आणले. उपांत्यपूर्व फेरीत डेनिस शॅपोव्हॅलोव्हविरुद्ध नदालला पाच सेट्सची झुंज द्यावी लागली होती, त्या तुलनेत येथे त्याला चार सेट्समध्येच सामना जिंकता आल्याने दिलासा मिळाला. बिग थ्रीपैकी नदाल एकटाच या स्पर्धेत खेळत असून फेडरर गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घेत आहे, त्यामुळे त्याला ही स्पर्धा हुकली आहे तर 9 वेळा ही स्पर्धा जिंकणाऱया जोकोविचला व्हॅक्सिनचा निकष पूर्ण केला नसल्याने त्याला स्पर्धा सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच मायदेशी पाठवण्यात आले होते.
बॉक्स
(फोटो -28 एसपीओ 02-इव्हान डोडिग-क्रिस्टिना म्लाडेनोविक करंडकासह)
म्लाडेनोविक-डोडिग मिश्र दुहेरीत अजिंक्य
फ्रान्सची क्रिस्टिना म्लाडेनोविक व क्रोएशियाचा इव्हान डोडिग यांनी ऑस्ट्रेलियाच्या जेमी फोर्लिस व जेसन कुबलर यांच्यावर 6-3, 6-4 अशी सहज मात करीत मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. प्रथमच एकत्र खेळताना या पाचव्या मानांकित जोडीने मिळविलेले हे पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. पावसामुळे हा सामनाही बंदिस्त छताखाली खेळविण्यात आला. क्रिस्टिना-डोडिग यांनी भक्कम सुरुवात करीत 4-3 वर असताना महत्त्वाचा ब्रेक मिळविला. नंतर क्रिस्टिनाने आपल्या सर्व्हिसवर पहिला सेट घेतला. ऑस्ट्रेलियाच्या वाईल्डकार्ड प्रवेश मिळविलेल्या जोडीची दुसऱया सेटमध्येही क्रिस्टिना-डोडिग यांनी सर्व्हिस भेदली. डोडिगने नेटजवळ शानदार खेळ केला. पण नंतर फोर्लिसने डोडिगला चुका करण्यास भाग पाडत 2-2 अशी बरोबरी साधली. क्रिस्टिना-डोडिग यांनी आणखी एक ब्रेक मिळवित तिरकस व्हॉलीवर सेटसह सामनाही संपवला.









