मंत्री देसाई यांचे नक्षलग्रस्त आदिवासी बांधवांशी व पोलीसांशी साधलेल्या संवादाचे राज्यभरातून कौतुक
नवारस्ता / प्रतिनिधी
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त छत्तीसगड सीमेस लागून असलेल्या गॅरापत्ती या गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील दुर्गम भागात प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पोलिसांच्या आणि दुर्गम नक्षलग्रस्त भागातील स्थानिक आदिवासी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. नक्षलवादी हल्ल्यामुळे नेहमी संवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्हयामध्ये ना.शंभूराज देसाई यांनी ग्यारापत्ती येथील पोलीस आऊट पोस्टला जाऊन पोलिसांमार्फत राबविण्यात येणाऱ्या नाविण्यपूर्ण अशा दादालोरा खिडकी योजनेमधील विविध उपक्रमांची माहिती घेतली. आदिवासी बांधवांच्या जनजागृती मेळाव्यास उपस्थित राहून या दुर्गम भागातील आदिवासी समाजाशी संवाद साधला. पोलीस विभागामार्फत मनोधैर्य वाढविण्याचा मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांच्या या दौऱ्याचे संपूर्ण राज्यातून कौतुक होत आहे.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गडचिरोली येथील अतिसंवेदनशील भागातील आदिवाशी बांधवांचे जनजागरण मेळाव्यादरम्यान आपला मंत्रीपदाचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून या मेळाव्यास उपस्थित असलेल्या आदिवासी बांधवांशी आपुलकीने विचारपूस करून संवाद साधला. त्यामुळे गृहराज्यमंत्री ना. देसाई यांचे बद्दल उपस्थितांमध्ये कुतुहल निर्माण झाले. तर पोलीस दल आणि नक्षली यांच्यात झालेल्या चकमकीतील जखमी जवानांची घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्याबरोबर चकमकी बाबत चर्चा केली व तब्येतीची विचारपूस केली. राज्यमंत्री देसाई यांनी संबंधित जवानाला शासनाकडून जी काही मदत लागेल ते देण्याचे आश्वासनही दिले.








