700 वर्षांपासून शापित आहे गाव भारताची मोठी लोकसंख्या आजही गावांमध्ये राहते. देशातील प्रत्येक गावाची एक वेगळी प्रथा आणि संस्कृती असते. राजस्थानमधील एक गाव एका गोष्टीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. चुरू जिल्हय़ातील उडसर गाव एका अजब कहाणीसाठी ओळखले जाते. या गावात मागील 700 वर्षांमध्ये कुणीच स्वतःचे घर दुमजली केले नाही. या गावात कुणी दुमजली घर उभारले तर त्याच्या कुटुंबाला अडचणींना तोंड द्यावे लागेल असा शाप या गावाला मिळाला असल्याचे ग्रामस्थांचे सांगणे आहे.
या गावाला 700 वर्षांपूर्वी शाप मिळाल्याने ग्रामस्थांचे जीवनच बदलले. आजही या गावात कुणाची दुमजली घर उभारण्याची हिंमत झालेली नाही. 700 वर्षांपूर्वी या गावात भेमिया नावाचा एक व्यक्ती राहत होता. एकेदिवशी गावात चोर आल्याचे त्याला समजले. गावकऱयांचे गुरं चोरून नेणाऱया चोरांना भेमिया एकटाच भिडला. चोरांनी केलेल्या मारहाणीमुळे भेमिया रक्तबंबाळ झाला. भेमिया चोरांपासून वाचण्यासाठी स्वतःच्या सासरी पोहोचला आणि घराच्या दुसऱया मजल्यावर लपला. चोरांना त्याचा पाठलाग केला आणि त्याला तेथूनही पकडले.
चोरांनी भेमिया आणि त्याच्या सासरच्या लोकांनाही मारहाण केली. जखमी असूनही प्रतिकार करणाऱया भेमियाचा चोरांनी गळा चिरला. ही घटना भेमियाच्या पत्नीला समजताच तिने संतापाच्या भरात ग्रामस्थांना शाप दिला. जर कुणी या गावात स्वतःचे घर दुमजली केले तर त्याच्या कुटुंबाचा सत्यानाश होईल असा शाप तिने दिला होता. त्यानंतर भेमियाचे गावात मंदिर उभारण्यात आले, परंतु आजपर्यंत कुणीच स्वतःचे घर दुमजली केलेले नाही. परंतु या कहाणीचा कुठलाच ठोस पुरावा नाही.









