तैपेईविरुद्धचा सामना रद्द
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
भारतीय संघाचे एएफसी महिला आशिया चषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. भारतीय संघातील 12 महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे तसेच दोन खेळाडू जखमी असल्याचे आढळून आल्यानंतर चिनी तैपेईविरुद्ध रविवारी होणारा सामना रद्द करण्यात आल्याचे अ.भा. फुटबॉल फेडशेनने सांगितले.
‘भारताचे अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने गट अ मध्ये चिनी तैपेईविरुद्ध होणाऱया सामन्यासाठी 13 खेळाडू उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. एखादा संघ सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकला नाही तर नियमानुसार त्यांनी माघार घेतलीय, असे मानण्यात येते,’ असे एएफसीने सांगितले. हा सामना रद्द झाल्याने भारताची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची संधीही हुकली आहे. भारताला पहिल्या सामन्यात इराणने गोलशून्य बरोबरीत रोखले होते. त्यामुळे हा सामना भारतासाठी महत्त्वाचा होता. या अनपेक्षित परिस्थितीमुळे संघासह देशातील फुटबॉलशॉकीनही नाराज झाले आहेत. बुधवारी भारताचा शेवटचा गट साखळी सामना चीनविरुद्ध होणार होता. पण 13 खेळाडू उपलब्ध होणार नसल्याने हा सामनाही आता होऊ शकणार नाही. 30 जानेवारीपासून बाद फेरीचे सामने होणार आहेत. सर्व बाधित खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.









