प्रतिनिधी / गोडोली :
महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वपुर्ण योगदान डॉ. एन.डी.पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे आधारवड होते. आयुष्यभर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचे वारसदार असणारे डॉ. एन.डी.सरांनी रयतेच्या विस्तार आणि प्रगतीसाठी केलेले कार्य आदर्शवत आहे. त्यांच्या निधनाने कर्मवीरांच्या विचारांचा आधारवड हरपला,” अशी भावना
ना.विश्वजित कदम यांनी ऑनलाईन शोकसभेत व्यक्त केली.
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, माजी चेअरमन, पुरोगामी विचारवंत प्रा.डॉ. एन.डी.पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी त्यांच्या आठवणी, जीवनातील प्रसंग सांगितले.
यावेळी चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी,” रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी,सेवक, चेअरमन,उपाध्यक्ष डॉ.एन.डी. पाटील हा कर्मवीरांनी उभा केलेला 78 वर्षे कार्यरत असलेला शेवटचा दुवा निखळला,” अशी भावना व्यक्त केली. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी,” राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात विचार आणि कृती देणारे महाराष्ट्राच्या क्षितिजावरील एक चमकता तारा निखळलेला आहे. माझ्या सारखे लाखो विचारांचे वारसदार घडविणारे विचारांचे विद्यापीठ म्हणजे डॉ.एन.डी सर होते. प्रत्येक क्षेत्रात अतुलनीय दिलेले योगदान चिरंतन आदर्शवत ठरेल,”असे सांगून काही आठवणी सांगितल्या. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ऑनलाइन मनोगत व्यक्त केले.
यावेळी ऍड.दिलावर मुल्ला, सचिव डॉ.विठ्ठल शिवणकर,सह सचिव प्राचार्य प्रतिभा गायकवाड, सह सचिव संजय नागपुरे , आँडीटर डॉ. शिवलिंग मेनकुदळे हे उपस्थित होते. विचारवंत किशोर बेडकिहाळ, अ.नि.स.चे डॉ. हमीद दाभोलकर, एल.बी.काँलेजचे प्राचार्य शेजवळ, प्राचार्य यशवंत पाटणे, माजी आमदार लक्ष्मण माने, अजित साळुंखे,सामाजिक कार्यकर्ते दिनकर झिम्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मर्यादित संख्येने उपस्थित होते.
डॉ. एन.डी.पाटील यांच्या स्मरणार्थ सेंटर
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. एन.डी.पाटील यांच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याचे कार्यकर्ते घडविणारे सेंटर सुरू करण्यात येणार आहे. डॉ. एन.डी.पाटील यांच्या स्मरणार्थ हे सेंटर लवकरच सुरू होणार असल्याचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी यावेळी जाहीर केले.