सरकारकडून मिळेना अनुदान, लाभार्थी प्रतीक्षेत
प्रतिनिधी/ बेळगाव
बेरोजगार तरुणांसाठी स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी राज्य सरकारने आणलेली प्रवासी टॅक्सी योजना अनुदानाअभावी रखडली आहे. त्यामुळे शेकडो अर्जदार तरुण दोन वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत. कोविडचे कारण सांगून राज्य सरकारने आर्थिक तरतूद केली नाही.
सरकारकडून दरवषी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक व मागासवर्गीय बेरोजगार तरुणांसाठी प्रवासी टॅक्सी खरेदीसाठी अनुदान दिले जात होते. 20 ते 24 वर्षे वयाच्या दहावी उत्तीर्ण व लघु वाहन परवानाधारक तरुणांना ही योजना लागू केली आहे. टॅक्सी घेणाऱया लाभार्थींसाठी कमाल 3 लाख रुपये साहाय्यधन दिले जाते. त्यासाठी लाभार्थी टॅक्सी घेणाऱया टॅक्सीच्या एकूण किमतीपैकी 5 टक्के रक्कम लाभार्थीला भरावी लागते. उर्वरित रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेतून लाभार्थीला कर्ज घेता येते. 2020-21 आणि 2021-22 या वर्षांत कोविड कारणामुळे राज्य सरकारने अनुदान मंजूर केले नसल्याने योजना तूर्तास स्थगित झाल्यासारखी आहे.
पर्यटन विभागाचे कामच सध्या थंड झाले आहे. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी कर्नाटक दर्शन कार्यक्रम आयोजित केला जात होता. आठवीपासूनच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील ऐतिहासिक वास्तू, परंपरागत स्थळे या ठिकाणी भेटी दिल्या जात होत्या. आता गेल्या दोन वर्षांपासून हे पर्यटनही बंदच आहे.
कोविडपूर्व काळातही टॅक्सी घेण्यासाठी अर्ज करणाऱयांची संख्या अधिक होती. काही जिल्हय़ात जादा अर्ज झाल्याने लॉटरी पद्धतीने सोडत काढल्याच्याही घटना घडल्या आहेत. आताही अनेक तरुण या योजनेची प्रतीक्षा करत असले तरी सरकारकडून ही योजनाच स्थगित झाल्याने लाभार्थी आता सरकार कधी यासाठी निधी देणार, याकडे डोळे लावून बसले आहेत.









