लक्ष्मीकांत पार्सेकरांनी सोडला पक्ष
प्रतिनिधी/ पणजी
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे अखेर भाजपला रामराम ठोकला असून मांद्रे मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचे ठरविले आहे. गोवा प्रदेश भजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या नावे राजीनामा पत्र सादर केले असून त्याची एक प्रत त्यांनी पक्षाचे महामंत्री सतिश धोंड यांनाही पाठविली आहे. त्यांच्याबरोबर 400 कार्यकर्त्यांनीही राजीनामे दिले आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा आपण तातडीने राजीनामा देत असून हा राजीनामा स्वीकृत करण्यात यावा. पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, असे पार्सेकर यांनी या पत्रात म्हटले आहे.
जड अंतःकरणाने सोडतोय भाजप
या संदर्भात माहिती देताना प्रा. पार्सेकर म्हणाले आपण आज नाईलाजाने आणि अत्यंत जड अंतःकरणाने भाजपशी असलेले कैक वर्षाचे सबंध तोडताना भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. आपण एक दोन दिवसात पुढील निर्णय जाहीर करणार आहे. त्यासाठी सद्या आपण मतदारसंघात फिरून माझ्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधत आहे. अपक्ष निवडणूक लढवण्याशी आपण ठाम असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी तरुण भारतशी बोलताना केला.
ती प्रत म्हणजे ‘धोंड’साठी पोचपावती
अध्यक्षांबरोबरच आपण भाजपचे महामंत्री सतीश धोंड यानाही राजीनाम्याची प्रत का पाठवली? यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की माझा भाजपचा राजीनामा ही ‘धोंड’साठी पोचपावती आहे. तेच या राजीनाम्याच्या मुळाशी आहेत. माझ्यासारख्या भाजपच्या सच्च्या शिलेदारांना तेच राजीनामा सादर करण्याची पाळी आणीत आहेत. पक्षाची प्रतिमा त्यांच्यासारख्या धेंडामुळेच आज मलिन होत आहे. पक्षाची तत्वे बासनात गुंडाळून पक्षाला वाटचाल करावी लागत आहे. माझ्या सारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी ही मनमानी मुकाटय़ाने सहन केल्यास उरली सुरली पक्षाची पत शिल्लक राहणार नाही, त्यामुळे पश्चताप करण्यापेक्षा वेळीच पक्षापासून जड अंतःकरणाने दूर होण्याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागला, असे ते म्हणाले.
पक्षाने दूर केल्याचे शल्य
माजी मुख्यमंत्री, माजी भाजप पक्षाध्यक्ष प्रा लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याबरोबर भाजप मांदेत आणि गोव्यात रुजवला, मोठा केला. पक्षाला राज्यात सत्तेवर आणले. भाजपच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. ज्या पक्षाला आपण मोठा केला त्या पक्षाने आपल्याला अशाप्रकारे दूर केले याचे शल्य आपल्या मनात आहेच, त्यापेक्षा पक्षाशी फारकत घेताना माझी अवस्था अत्यंत बिकट झाली आहे असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. केवळ माझ्या समर्थक कार्यकर्त्यासाठी आणि गोव्याच्या हितासाठी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचे ते वारंवार सांगत होते.
पार्सेकर संघाचे, भाजपचे जाणते नेते
पार्सेकर हे संघाचे तसेच भाजपचे जुने जाणते नेते आहेत. त्यांनी भाजपचे अध्यक्ष व मुख्यमंत्री अशी महत्त्वाची पदे आणि इतर जबाबदाऱया मोठय़ा खुशीने संभाळल्या आहेत. त्यांना भाजपची मांद्रे मतदारसंघतील उमेदवारी मिळणार अशी अपेक्षा होती. ती फ्ढाsल ठरली. त्याचा मनःस्ताप होऊन शेवटी त्यांना पक्षाचा राजीनामा देण्याच्या निर्णयापर्यंत यावे लागले. आता ते अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्यामुळे मांद्रे मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार दयानंद सोपटे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे. शिवाय भाजपला अन्य मतदारसंघांत देखील घरचेच आव्हान मिळाले आहे.









