सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय
सध्या प्रत्येकजण एक इंजिनियर किंवा डिझाइनर होऊ इच्छितो. विशेषकरून महिलांसाठी जगाच्या नजरेत काही निवडकच क्षेत्रे आहेत. परंतु ब्रिटनमधील एका युवतीने गवंडीकाम करत सर्वांना चकीत केले आहे. या महिलेचे नाव डार्सी रिचर्ड्स आहे. ब्रिटनमध्ये गवंडीकाम करणारी ती एकमात्र महिला आहे. विटा उचलण्यापासून सिमेंटद्वारे प्लास्टर करण्यापर्यंतचे प्रत्येक काम डार्सी स्वतःच करते.
सोशल मीडियावर अनेक युजर्सनी तिची थट्टा केली होती. ती सुंदर नसल्यानेच हे काम करत असल्याचेही म्हटले गेले. तसेच्या तिच्या कामाच्या वेगावरूनही तिला लक्ष्य करण्यात आले होते. परंतु डार्सीने स्वतःच्या कामाद्वारे या सर्वांना प्रत्युत्तर दिले आहे.
डार्सी इंग्लंडच्या ओल्ड बकेनहॅमच्या नोरफोल्कमध्ये राहते. ती टिकटॉकवर अत्यंत लोकप्रिय आहे. महिला बांधकाम देखील करू शकतात आणि आपण स्वतः याचे उदाहरण असल्याचे ती सांगते. डार्सी महिलांना गवंडीकामाबद्दल प्रेरित करण्यासाठी सोशल मीडियावर स्वतःची छायाचित्रे पोस्ट करत असते. यात काही छायाचित्रांमध्ये ती भिंत निर्माण करताना तर काहींमध्ये विटा उचलताना दिसून येते. अंग मेहनत करण्यास ती घाबरत नसल्याचे आणि स्वतःचे काम पूर्ण मन लावून करत असल्याचे या छायाचित्रांमधून स्पष्ट होते.

ब्रँड ऍम्बेसिडर
स्वतःच्या याच गवंडीकामामुळे लोक तिला ओळखू लागले आहेत. ब्रिटनचा लोकप्रिय ब्रँड स्क्रफ वर्कवियरने तिला स्वतःचे ब्रँड ऍम्बेसिडर केले आहे. इन्स्टावर तिला 12 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. डार्सीच्या खऱया कहाणीने महिला प्रत्येक काम करू शकतात हे दाखवून दिले आहे. डार्सी सारख्या महिला समाजाता बदल घडवून आणत आहेत आणि महिला आता स्वतंत्र आणि सामर्थ्यशाली असल्याचे सांगत आहेत.









