खासदार धैर्यशील माने यांचे निर्देश
शिराळा/ प्रतिनिधी
चांदोली पर्यटन क्षेत्र हे शिराळ्याचे सर्वात मोठे वैभव आहे. हे वैभव जगाच्या समोर येणे ही काळाची गरज आहे. चांदोली पर्यटन क्षेत्र विकसीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विकास आराखडा तयार करून तो शासनास सादर करावा, असे निर्देश खासदार धैर्यशील माने यांनी दिले.
शिराळा तालुक्यातील चांदोली येथे वन्यजीव विभागाच्या बैठक सभागृहात चांदोली अमेझिंग प्रोजेक्टची आढावा बैठक खासदार धैर्यशिल माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीवराव नाईक, तहसिलदार गणेश शिंदे, उपवनसंरक्षक उत्तम सावंत, विभागीय वनसंरक्षक श्री. माने, गटविकास अधिकारी श्री. राऊत तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार धैर्यशिल माने यावेळी म्हणाले, चांदोली पर्यटन क्षेत्र व व्याघ्र प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात मोठी संधी असलेले क्षेत्र आहे. हे क्षेत्र पर्यटकांसमोर येण्यासाठी त्याचा कालबध्द विकास होणे ही काळाची गरज आहे. चांदोली पर्यटन क्षेत्र लोकल ते ग्लोबल करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चांदोली अभयारण्यातील जैवविविधता, निसर्ग सौंदर्य, दुर्मिळ प्राणी, पक्षी जगासमोर यावे यासाठी टप्याटप्याने याचा विकास व्हावा यासाठी पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. त्यानुसार राज्य शासनाने याबाबतचा सविस्तर प्रस्ताव मागविला असून चांदोलीच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील 10 वर्षातील गरजा लक्षात घेवून संबंधित यंत्रणांनी प्रस्ताव करावेत, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर चांदोलीच्या आसपासचा परिसर ही सुधारावा. यासाठीही यंत्रणांनी प्रस्ताव तयार करावेत. चांदोली पर्यटन क्षेत्र जागतिक स्तराचे डेव्हलप झाल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे सांगली जिल्हा जागतिक स्तरावर पोहोचेल व पर्यटनाच्या माध्यमातून शासनाला आर्थिक फायदा होईल. त्यासाठी वन व वन्यजीव विभागाने चांदोली ब्रँड विकसीत करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्याहस्ते अमेझींग चांदोली या लोगोचे व पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले. तसेच अमेंझींग चांदोली टी शर्ट लाँच करण्यात आला. चांदोलीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी राजीव पाटील यांनी तयार केलेल्या सोशल मीडिया रिल्सचे फेसबुक पेज व युट्युब चॅनेल व ट्रेलर चे लॉचिंगही यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्याहस्ते करण्यात आले. या बैठकीत वन विभाग व वन्यजीव विभाग, बांधकाम विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग यांनी चांदोली पर्यटन विकासाबाबतचे थोडक्यात सादरीकरण केले.