अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 21 जानेवारी 2022 सकाळी 11.10
● बैठका, सभा होताहेत ऑनलाईन
● शासकीय कर्मचाऱ्यांचे कोरोनाच्या सुट्टीवर जाण्याचे प्रमाण वाढले
● ग्रामीण भागातील खाजगी डॉक्टरांकडून सेवा देण्याचे काम सुरू ठेवल्याने मानले जातेय आभार
● जिल्ह्यात नव्याने 1554 जण बाधित
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात शाळांची सोमवारपासून पुन्हा घंटा वाजणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी तसे आदेश शाळांना दिल्याने आनंदीआनंद व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयामध्ये अनेक अधिकारी, कर्मचारी बाधित येत असल्याने ते कोरोनाच्या रजेवर घरीच उपचार घेत आहेत. ग्रामीण भागातील खाजगी डॉक्टर ओपीडीमधून सेवा देत असल्याने त्यांचे कौतुक होत आहे. नव्याने जिल्ह्यातील 1554 जण बाधित आढळून आले असून घरच्या घरी उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
जिल्ह्यात शाळांची घंटा वाजणार
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दि.21 रोजी जिल्ह्यातील केजीपासून ते 12 वी पर्यंतच्या शाळा ऑफलाईन सुरू करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार शाळांची घंटा वाजणार असल्याने पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. तसेच त्या आदेशानुसार शाळांच्या परिसरात स्वच्छता, टापटीप ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, 12 वी पासून वरच्या वर्गाबाबत आदेश दिला नसल्याने संभ्रम निर्माण झालेला आहे.
शासकीय कार्यालयात कोरोनाच्या सुट्टीचे प्रमाण वाढले
जिल्हा परिषदेत अनेक खाते प्रमुखांना कोरोनाची बाधा झाल्याने रजेवर आहेत. ते घरातुन ऑनलाईन वर्क करत आहेत. एका खाते प्रमुखाची एका फाईलवर सही गरजेची आहे परंतु ते बाधित असल्याचे समजल्याने फाईल ही टेबलावर पडून आहे. तर पालिकेत एका विभागाचे अधिकारी कोरोनाच्या रजेवर गेल्याने एका नागरिकाला तक्रारीचा अर्ज थेट अर्ज द्यायचा होता तोच अर्ज देता आला नाही. तर सातारा पंचायत समितीमध्ये एक अधिकारी रजेवर गेल्याने अफवांचे पेव फुटले होते. दरम्यान, ऑफलाईन बैठका, सभा बंद करण्यात आल्या असून ऑनलाईन घेतल्या जात आहेत.
ग्रामीण भागात खाजगी डॉक्टर देतात सेवा
ग्रामीण भागात सर्दी, खोकला , ताप यासारखे लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांना कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात खाजगी डॉक्टर उपचार करत नव्हते. मेडिकलमधून गोळी सुद्धा दिली जात नव्हती. आता ग्रामीण भागातील खाजगी डॉक्टर त्यांच्या ओपीडीमधून सेवा देत आहेत. त्यामुळे खाजगी डॉक्टरांचे कौतुक होत आहे. घरच्या घरी उपचार करणाऱ्या रुग्णाना सल्ला देत आहेत.
जिल्ह्यात रुग्णालयात उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या मोठी
जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 7 हजार 500च्या आसपास आहेत. त्यातील गंभीर रुग्ण 11 असून 303 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तर नव्याने जिल्ह्यात 5245 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले त्यात 1554 जण बाधित आढळून आले.
शनिवारी
नमुने-5245
बाधित-1554
शनिवारपर्यंत
नमुने-24,10,479
बाधित-2,67,389
मुक्त-2,50,037
मृत्यू-6,522