ऑनलाईन टीम / पणजी
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून 1000 टॅक्सी भाड्याने आणल्याबद्दल गोवा सरकारवर जोरदार टिका करताना गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी शुक्रवारी म्हटले की, लोभी आणि भ्रष्ट भाजप सरकाऱ शेजारील राज्यातून टॅक्सी भाड्याने आणून गोव्यातील टॅक्सी चालकांना व्यवसायापासून वंचित करत आहे. “भाजपने हे केवळ कमिशन मिळवण्यासाठी केले आहे. तसे नसल्यास, नवीन निविदा काढा आणि यासाठी गोव्याची वाहने घ्या.” असे म्हार्दोळकर म्हणाले.
ॲड. म्हार्दोळकर यांनी गजानन तिळवे, अर्चित नाईक, विवेक डिसिल्वा, साईश आरोसकर व हिमांशु तिवरेकर यांच्या सोबत पणजीत पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर टीका केली. गजानन तिळवे म्हणाले की, जीटीडीसीचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी वाहने भाड्याने घेण्याची निविदा काढली आणि त्यात अशा अटी घातल्या की गोमंतकीय टॅक्सी चालकांना व्यवसाय मिळणार नाही. “पारंपारिक टॅक्सी चालक वंचित आहेत. दयानंद सोपटे यांनी महाराष्ट्रातील कंपनीला कमिशनसाठी हे कंत्राट दिले आहे काय .” असा प्रश्न तिळवे यांनी केला. ते म्हणाले की, भाजपला गोव्यातील गरीब जनतेची आणि राज्यातील पारंपरिक व्यवसायाची पर्वा नाही. “कोविडच्या काळात गोव्यातील टॅक्सी चालकांना त्रास सहन करावा लागला, मात्र त्यांना कोणताही व्यवसाय देण्यात आलेला नाही. टॅक्सी मीटरचा खर्चही खूप होता.” असे ते म्हणाले.
जीटीडीसीने निविदेसाठी तयार केलेले, दहा लाख रुपयांची ठेवी आणि ३ कोटी उलाढाल, हे निकष गोवावासियांना पूर्ण करता आले नाहीत. “गोव्यात सुमारे 25 हजार टॅक्सी आहेत. हा व्यवसाय त्यांना का दिला नाही. गोवावासीय या निविदेसाठी पात्र ठरणार नाहीत म्हणून ही अट घालण्यात आली आहे. ” असे ते म्हणाले. कमिशनसाठी निविदा महाराष्ट्रातील कंपनीला दिल्याचा आरोप म्हार्दोळकर यांनी केला. “टॅक्सी चालक त्यांच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशा स्थितीत सरकारने त्यांना साथ द्यायला हवी होती, पण त्याऐवजी महाराष्ट्रतील टॅक्सीचालकांना व्यवसाय दिला आहे. ” असे ॲड म्हार्दोळकर म्हणाले.
“सरकारने सर्व टॅक्सींसाठी मीटर अनिवार्य केले आहे. मग ही वाहने मीटरशिवाय का आणली जातात. हे सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न त्यांनी केला.ते म्हणाले की, आयएसएल दरम्यान हीच चूक झाली होती, नंतर सरकारला स्थानिकांना व्यवसाय देण्यास भाग पाडले गेले. अॅड. म्हार्दोळकर म्हणाले की, ‘स्वयंपूर्णा’ आणि भाजपच्या इतर घोषणा नावासाठी आहेत. “भाजपचे नेते कमिशन घेऊन स्वयंपूर्ण झाले असतील, गोव्याचे लोक नाहीत.” असे ते म्हणाले.गोव्यातील लोक भाजपला घरी पाठवतील असे ते म्हणाले. अमरनाथ पणजीकर अध्यक्ष-प्रदेश कांग्रेस माध्यम विभाग