वर्षभरात 24 कारवायांमध्ये 23 अधिकारी, 14 पंटर जेरबंद
कोल्हापूर / आशिष आडिवरेकर
सरकारी कार्यालय आणि सहा महिने थांब असा अनुभव प्रत्येक नागरिकाला येतो. पण हाच अनुभव बदलायचा असेल तर कामासाठी आर्थिक वजन वापरावे लागते. खाबूगिरीने गुरफटलेल्या सरकारी बाबूंना वेसन घालण्याचे काम लाचलुचपत विभाग करत आहे. यंदा लाचलुचपत विभागाने विविध सरकारी कार्यालयात 24 कारवाया करुन 23 सरकारी अधिकारी कर्मचाऱयांसह 14 पंटरना जेरबंद केले आहे. यंदाच्या वर्षीही लाचखोरीमध्ये महसूल आणि पोलीस विभाग आघाडीवर आहे. यंदा लाच मागणेच्या रकमेतही वाढ झाली असून 2 हजारापासून 45 लाख रुपयांपर्यंतची बोली लागल्याचे दिसत आहे.
सरकारी कार्यालयातील काम म्हणजे आर्थिक वजन असे समीकरण बनले आहे. आर्थिक वजन ठेवल्यानंतर कामाला आपोआपच पाय फुटतात. नाही तर फाईल गहाळ होणे, त्यामध्ये त्रुटी निघणे असे प्रकार घडवून आणले जातात. आणि यामुळे संबंधित नागरिकास वारंवार सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. किरकोळ कामासाठीही सर्वसामान्यांची अडवणूक करणारी एक टोळीच सरकारी कार्यालयांमध्ये ऍक्टीव्ह असते. अशा या टोळीचा बिमोड करण्याचे आवाहन यंत्रणेसमोर आहे.