हिडकल जलाशयाचा पाणीपुरवठा ठप्प : शहरात पुन्हा पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता
प्रतिनिधी / बेळगाव
पाणीपुरवठा कामगारांनी मागण्यांसाठी आंदोलन छेडल्याने शहरातील पाणीपुरवठा नियोजन कोलमडले होते. त्यामुळे अजूनही विविध भागात पाणीटंचाई आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आता तुम्मरगुद्दी पंपहाऊसमधील जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे आता पुन्हा पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा मंडळाने 359 कामगार हंगामी तत्त्वावर घेतले होते.
15 ते 20 वर्षे सेवा बजावूनही कायम करण्यात आले नसल्याने कामगारांनी आंदोलन छेडून कामबंद केले होते. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला होता. कामगारांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होत असतानाच बुधवारी मध्यरात्री तुम्मरगुद्दी पंपहाऊसमधील पाईपचे व्हॉल्व पॅकिंग खराब झाले आहे. रात्री 1 वाजता व्हॉल्व पॅकिंग खराब होऊन मोठय़ा प्रमाणात गळती लागली होती. त्यामुळे रात्री सर्व पंप बंद ठेवण्यात आले आहेत. तर दुरुस्तीसाठी 12 तासांहून अधिक वेळ लागणार असल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. आधीच पाणीटंचाईमुळे वैतागलेल्या नागरिकांना आता पुन्हा पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.









