3 महिन्यांत 300 कोटींची माया जमविली
मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी स्वतःचे पैसे नातेवाईक भूपिंदर सिंह हनीच्या घरी लपविल्याचा आरोप शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांनी केला आहे. चन्नी हे वाळूमाफियांचे म्होरके आहेत. तीन महिन्यामंध्ये चन्नी यांनी 300 कोटी रुपयांची माया जमविली आहे. भूपिंदरच्या घरातून मिळालेले 10.70 कोटी रुपये हिमनगाचे केवळ एक टोक आहे. मुख्यमंत्री चन्नी यांच्या घरी छापे टाकल्यास ट्रक भरून पैसे निघतील असे सुखबीर म्हणाले.
अकाली दलाचे सरकार सत्तेवर आल्यास मुख्यमंत्री चन्नी यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. तसेच वाळूमाफियांकडून हडपण्यात आलेला पैसाही बाहेर काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाच्या घरातून कोटय़वधींचे घबाड सापडल्यावर त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते असे विधान सुखबीर यांनी केले आहे.
आम आदमी पक्षाची फोन कॉल्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री निवडण्याची प्रक्रिया बनावट आहे. 4 दिवसांमध्ये कुठल्याही स्थितीत एकाच क्रमांकावर 24 लाख कॉल्स येऊ शकत नाही. आम आदमी पक्षाचा डेरा बाबा नानक येथील उमेदवारावर देशद्रोहाचे दोन गुन्हे नोंद असून तो दहशतवादी राहिला आहे. लुधियानात देखील चार उमेदवारांवर हत्या, फसवणूक आणि खंडणीवसुलीचे गुन्हे नोंद असल्याचा दावा सुखबीर यांनी केला आहे.









