गौरी आवळे / सातारा :
अल्पवयीन मुलींना लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. गतवर्षीच्या नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात 35 अल्पवयीन मुली व 5 मुले बेपत्ता झाल्याची माहिती भरोसा सेल सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता मेणकर यांनी दिली. यातील 20 मुलींना व 4 मुलांना शोधण्यात पोलीसांना यश आले आहे.
कोरोनाचा संसर्ग कायम असताना ऑनलाईन शिक्षण आणि वाढता सोशल मीडियाचा वापर यामुळे अल्पवयीन मुले-मुली यांच्याकडून नकळत होणाऱ्या चुका त्यांच्यासाठी जीवघेण्या ठरत आहेत. मुलींना मिळालेल्या स्वतंत्र्याचा त्या गैरफायदा घेत असल्याची चर्चा नेहमीच रंगत असते. गेल्या काही दिवसापासून अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडत आहेत. काही वेळेला मुलगी नेमकी कुठे गेली, हे समोर येत नाही. अज्ञाताने फूस लावून पळवून नेली अशी तक्रार पालक करत असतात. त्यामुळे अज्ञाताविरूद्ध संबंधित पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असतो. 2021 या गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात 14 मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर डिसेंबर महिन्यात 21 मुलीसह 5 मुले बेपत्ता झाली आहेत. तर याच दोन महिन्यात 20 मुलींना व 4 मुलांना शोधण्यात पोलीसांना यश आले आहे. वाढत्या अत्याचाराच्या घटनामुळे मुलींच्या सुरक्षितेच्या काळजीने आई-वडील तिच्यावर बंधने घालण्याचा प्रयत्न करतात. त्यातून घरात छोटे-मोठे खटके उडतात. घरात आपले कोणी ऐकत नाही असा समज करून घेतात. शाळा बंद असल्याने अल्पवयीन मुलांच्या हाती मोबाईल आला आहे. अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग, मैत्री वाढल्याने यांचा गैरफायदा घेतला जावून लग्नाचे आमिषाने मुलीना फुस लावून पळवून नेले जात आहे.
अनैतिक व्यापारासाठी अपहरण नाही…
अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यानंतर अपहरणाचे गुन्हे दाखल होतात. तपासात मुली सापडल्यानंतर प्रेम प्रकरणातून त्या पळून गेल्याचे खरे कारण समोर येते. आतापर्यंत जिल्ह्यात मुली बेपत्ता होण्याचे हेच मुख्य कारण आहे. अद्याप जिल्ह्यात अनैतिक व्यापारासाठी एकाही मुलीचे अपहरण झालेली घटना घडलेली नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मेणकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात मुलींवरील अत्याचाराचा आढावा
सन 2019 बलात्काराचे 93 गुन्हे, 2020 मध्ये 91, 2021 ऑक्टोबर अखेर 90 गुन्हे दाखल
सन 2019 मध्ये फुस लावून पळवून नेण्याचे 209 गुन्हे, 2020 मध्ये 167, 2021 ऑक्टोबर अखेर 175 गुन्हे दाखल, 97 मुली शोधण्यात पोलीसांना यश
सन 2019 मध्ये विनयभंगाचे 88 गुन्हे, 2020 मध्ये 59, 2021 ऑक्टोबर अखेर 63 गुन्हे दाखल