ऑनलाईन टीम / मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता पटोले यांच्या अटकेची मागणी केली आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक आज, मंगळवारी होत आहे. त्यानिमित्ताने 16 जानेवारीला प्रचाराच्या अखेरच्या दिवशी लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील सभेत पटोले यांनी ‘मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’, असे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. गडकरी यांनी ट्विट करून यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, असे ट्विट गडकरी यांनी केले आहे.
दरम्यान, भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी सोमवारी संध्याकाळी भंडारा पोलीस ठाण्यात पटोले यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून, अधिक तपास करुन पुढील कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.








