सावंतवाडी/ वार्ताहर-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या व्याघ्र गणनेची नोंद व्यवस्थित होणे तसेच सावंतवाडी तालुक्यामध्ये पट्टेरी वाघ असतानादेखील त्याची माहिती वनविभागाकडून लपवली जाते असा आरोप मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केला. अनेक भागामध्ये बिबटे व अनेक वन्य जीव प्राणी या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून सावंतवाडी तालुक्यात काही मायनिंग क्रशर माफिया च्या घशात सरकारी वनजमिनी, फॉरेस्ट घशात घालण्याचे काम वनाधिकारी करत आहे हल्लीच आंबोली भागात पट्टेरी वाघाचे अस्तित्व आढळले तसेच बिबट्यांची संख्या वाढलेली आहे. सावंतवाडी तालुक्यामध्ये पाडलोस, आरोस, नाणोस, तिरोडा आदी भागांमध्ये बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामुळे अनेक शेतकरी ग्रामस्थ भयभीत आहेत याविषयी संबंधित ग्रामपंचायतीने आपणास वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत. परंतु आपल्या विभागाकडून कानाडोळा केला जात आहे. पाचव्या अखिल भारतीय व्याघ्र प्रगणना २०२२ मध्ये सर्वसाधारण रूपरेषा आणि क्षेत्रिय स्तरावरून माहिती संकलित करावयाची असून याबाबतचे प्रशिक्षण आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेले आहे व्याघ्र गणना १५ जानेवारी ते २१ जानेवारीपर्यंत असे सहा दिवस ही वन्य प्राणी व व्याघ्रगणना केली जाणार आहे. या पद्धतीचा उद्देश केवळ वाघांची संख्या निश्चित करणे नसून मोठ्या भूप्रदेशा वरील वाघ, बिबटे इतर मांसभक्षी प्राणी, तृणभक्षी प्राणी तसेच त्यांचे अधिवास व त्याच प्रमाणे प्राणी कुठे कसे आणि किती आढळतात त्याचा वावर व्याप्ती आणि भ्रमण यांचा अभ्यास करणे हा देखील आहे. नियत क्षेत्र स्तरावरून गोळा होणाऱ्या माहितीच्या आधारे अहवाल व्यवस्थित मुख्य वन संरक्षक क्लेमेंट बेन आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्याकडे सादर करत असताना आपल्या कार्यालयाकडून अधिकाऱ्यांकडून कोणतीही दिरंगाई होता कामा नये. दिरंगाई करताना व मायनिंग माफियांना वाचविण्याकरिता खोटे अहवाल सादर केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईलने जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही त्यांनी दिला.









