तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर तपासणी
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथे पोलिसांची स्वॅब तपासणी करण्यात येत आहे. हुबळी-धारवाडसह वेगवेगळय़ा जिल्हय़ांत मोठय़ा प्रमाणात पोलीस संक्रमित झाल्याने बेळगावातही तपासणी करण्यात येत आहे.
पहिल्या व दुसऱया लाटेवेळी पोलीस दलावर मोठा ताण होता. लॉकडाऊन, बंदोबस्त, होम क्वारंटाईनवर निगा आदी कामे त्यांना लागली होती. दुसऱया लाटेत अनेक अधिकारी व पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. ही गोष्ट लक्षात घेऊन सध्या सर्व पोलीस स्थानकात सरसकट स्वॅब तपासणी करण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसांत मार्केट, बेळगाव ग्रामीण, शहापूर, कॅम्प आदी विविध पोलीस स्थानकात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने स्वॅब तपासणीचा निर्णय घेतला असून बिम्स, शहापूर येथील कचेरी गल्ली येथील अर्बन हेल्थ सेंटरसह वेगवेगळय़ा ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे.
कर्नाटकात वेगवेगळय़ा जिल्हय़ांत पोलीस संक्रमित झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मेकेदाटू योजनेच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेसने हाती घेतलेल्या पदयात्रेच्या बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वत्र पोलिसांची स्वॅब तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तिसऱया लाटेत मात्र संक्रमितांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत.









