प्रतिनिधी /बेळगाव
शहराला जोडणाऱया विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच राष्ट्रीय महामार्गाशेजारी सर्व्हिस रस्त्याला घालण्यात आलेली भिंत कोसळली आहे. कित्येक महिन्यांपासून ही भिंत हटविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांना अडथळा निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग ते शहरात येणारे काही रस्ते खराब झाले आहे. विशेषतः येडियुराप्पा रस्त्यावरील डांबर उखडल्याने रस्ता खडबडीत बनला आहे. काही ठिकाणी खड्डेदेखील निर्माण झाले आहेत. जेएनएमसी जवळदेखील संपर्क रस्त्यावर खड्डा निर्माण झाल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्गावरून शहरात येण्यासाठी सोडण्यात आलेल्या सर्व्हिस रस्त्याशेजारील भिंत कोसळली आहे. महामार्गाशेजारी बांधण्यात आलेली भिंत कोसळल्याने माती रस्त्यावर पसरली आहे. सदर भिंत कोसळून कित्येक महिने झाले, मात्र दुरुस्तीच्यादृष्टीने कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. 100 फूट लांबीची भिंत कोसळली असल्याने या रस्त्यावर अडथळा निर्माण झाला आहे. भिंत कोसळल्याने नागरिकांना समजण्यासाठी बॅरिकेड्स ठेवण्यात आले आहेत. अशातच हा रस्ता अरुंद असल्याने अवजड वाहनधारकांना ये-जा करताना अडचण निर्माण होत आहे.
संबंधितांचे दुर्लक्ष
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकार महामंडळाकडून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. मात्र, कोसळलेल्या भिंतीच्या दुरुस्तीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. सदर भिंतीचे बांधकाम करणे गरजेचे आहे. अन्यथा येथील माती घसरून महामार्गावरून जाणाऱया वाहनधारकांना अपघात होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महामंडळाने याची पाहणी करून भिंतीचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.









