पंधरा जानेवारीला क्रीडा दिन साजरा होणार
वार्ताहर/ कराड
ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव यांच्या 97 व्या जयंतीच्या निमित्ताने कार्वे नाका कराड येथील त्यांच्या स्मारकास कुस्तीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. खाशाबा जाधव यांच्या जयंतीच्या निमित्ताने 15 जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाने जाहीर केल्याने कुस्तीप्रेमींतून समाधान व्यक्त होत आहे.
ऑलिम्पिकवीर स्वर्गीय पै. खाशाबा जाधव यांची जयंती राज्य क्रीडा दिन म्हणून साजरी व्हावी, अशी मागणी मान अभिमान विकास फौंडेशन आणि ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार निवड समिती यांच्यावतीने सातत्याने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडे केली जात होती. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस प्रा. पै. बाळासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे 15 जानेवारीला राज्य क्रीडा दिन म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे समस्त कुस्ती प्रेमींच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार मानतो, असे मत आशियाई सुवर्णपदक विजेते पै. अमोल साठे यांनी व्यक्त केले.
जयंतीच्या निमित्ताने विविध मान्यवरांनी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी रणजित जाधव, मान अभिमान विकास फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. अरुण पिसाळ, मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशनचे सदस्य सागर पवार, अमोल साठे, उद्योजक, विजय भाईगडे, राष्ट्रीय कोच घोडवे, जितेंद्र थोरात, राष्ट्रीय पुरस्कार विजेते पै. महेश पवार, सातारा जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे खजिनदार पै. निलेश पाटील, राष्ट्रीय पुरस्कार विजेते पै. यशवंत थोरात, क्रीडालक्ष्य महाराष्ट्र अध्यक्ष पै. रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मिडिया साताराचे अध्यक्ष सचिन कुराडे व कुस्ती प्रेमी उपस्थित होते. दरम्यान, सकाळी पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गोळेश्वर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, रणजित जाधव यांनी स्मारकास अभिवादन केले. विनोद कदम यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत आणि आभार व्यक्त केले.









