वृत्तसंस्था/ बेंगळूर
आठव्या प्रो. कबड्डी लीग स्पर्धेतील शनिवारी येथे झालेल्या सामन्यात यूपी योद्धा संघाने तेलगु टायटन्सचा 39-33 अशा गुणांनी पराभव केला. दुसऱया एका सामन्यात दबंग दिल्ली संघाने शेवटच्या दोन मिनिटात दर्जेदार खेळ करत हरियाणा स्टीलर्सचे आव्हान 28-25 अशा गुणांनी संपुष्टात आणले. बंगाल वॉरियर्स व यू मुंबा यांच्यातील लढत 32-32 अशी बरोबरीत राहिली.
युपी योद्धा आणि तेलगु टायटन्स यांच्यातील सामन्यात युपी योद्धा संघातर्फे प्रदीप नरवालने 10 गुण, श्रीकांत जाधवने 7, सुरिंदर गिलने 7 गुण नोंदविले. तेलगु टायटन्स संघाला या स्पर्धेत आतापर्यंत एकही विजय नोंदविता आलेला नाही. तेलगु टायटन्सतर्फे रजनीश आणि अंकित बेनीवाल यांनी प्रत्येकी 9 गुण तर रोहितकुमारने 7 गुण नोंदविले. मध्यंतरापर्यंत यूपी योद्धाने तेलगु टायटन्सवर 19-14 अशी आघाडी मिळविली होती.
दबंग दिल्ली आणि हरियाणा स्टिलर्स यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. शेवटच्या दोन मिनिटामध्ये दबंग दिल्लीच्या खेळाडूंनी दर्जेदार खेळ करून हरियाणा स्टिलर्सचे आव्हान 28-25 असे संपुष्टात आणले. दबंग दिल्लीच्या विजयने 11 गुण नोंदविले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 11-11 असे बरोबरीत होते. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना पुन्हा दोन्ही संघांनी 21-21 अशी बरोबरी साधली होती पण दिल्लीच्या विजयने शेवटच्या दोन मिनिटात आपल्या संघाला 3 गुणांची आघाडी मिळवून देत हरियाणा स्टिलर्सचे आव्हान संपुष्टात आणले.
बंगाल वॉरियर्स आणि यु मुंबा यांच्यातील अटीतटीचा सामना 32-32 असा बरोबरीत राहिला. बंगाल वॉरियर्सतर्फे मणिंदर सिंगने 17 गुण तर यू मुंबातर्फे अभिषेक सिंगने 13 गुण नोंदविले. स्पर्धेच्या गुणतक्त्यात यू मुंबा संघ 28 गुणांसह सहाव्या तर बंगाल वॉरियर्स 25 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.









